मराठा समाजाने ज्ञानवंत बनावे- पुरूषोत्तम खेडेकर

Sunday, September 9, 2018

लातूर ,दि. 9 : ज्याच्यावर मराठा समाजाचे जीवन होते ती शेती संपलेली आहे. समाजाने आता ज्ञानवंत बनून काळाच्या ओघात जे बदल होतात ते स्विकारले पाहिजेत, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी रविवारी येथे बोलताना व्यक्त केले. 

मराठवाड्यात पुरूषोत्तम खेडेकर यांचा मराठा जनसंवाद दौरा सुरू आहे. रविवारी ते लातूर दौऱ्यावर होते. येथील डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, विभागीय अध्यक्ष लिंबराज सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष वैभव तळेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गुजर, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा वनिता काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सन 1962 पासून मराठा समाजाला आरक्षणातून वगळले आहे. पण, विदर्भात तसेच महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागात कुणबी मराठा म्हणून इतर मागासवर्गीयात (ओबीसी) समावेश आहे. विश्वास नांगरे पाटील याच आरक्षणातून ते आयपीएस झाले. 1994 पर्यंत एकूण आरक्षण 34 टक्के होते. पुढे ते 50 टक्क्यांपर्यंत आले. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 सदस्यीय खंडपीठाने 6 विरूद्ध 3 असा निवाडा देऊन आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाऊ नये असे म्हटले होते. हा निकाल 1992 मधील आहे. अपवादात्मक परिस्थिती वा कारण निर्माण झाल्यास आरक्षण वाढवता येईल असेही या निकालपत्रात म्हटले होते. नागपूर विधीमंडळाच्या अधिवेशनावर गोवारी समाजाने मोर्चा काढला होता. त्या मोर्चात चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी राज्य सरकारने या समाजाला 2 टक्के आरक्षण दिले. म्हणून आज ते 52 टक्क्यांवर आल्याचे खेडेकर यांनी सांगितले. 

शैक्षणिक व सामाजिक मागासलेल्यांना आरक्षण मिळू शकते. मराठा समाज यात बसतो. काही घराणे श्रीमंत आहेत म्हणून मराठा मागास नाही, असा निष्कर्ष काढता कामा नये. मंडल आयोगांनी त्यावेळी दुर्दैवाने मराठा समाजाची दखल घेतली नाही किंवा त्यास आपण कमी पडलो असावे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग तसेच नांदेड जिल्ह्यातील काही भागात मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळते. हेच आरक्षण मराठवाड्यातील मराठा समाजालाही मिळाले पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. याप्रसंगी प्रा. तनपुरे यांचेही भाषण झाले. 

या कार्यक्रमास मराठा समाजबांधव तसेच मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व संघाच्या सर्व 32 शाखांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी नवघरे यांनी केले. प्रा. गणेश बेळंबे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment