शिकागो : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जाहीर निशाणा साधत जनतेला त्यांना सत्तेतून बेदखल करण्याचे आवाहन केले. 'ट्रम्प यांचे राजकारण भय, द्वेष व संतापाचे आहे. त्यांच्या राजकारणामुळे अमेरिकेत असामान्य व धोकादायक स्थिती उद्भवल्यामुळे मतदारांनी त्यांना सत्तेतून बेदखल करण्याची वेळ आली आहे,' असे ओबामा यांनी म्हटले आहे..
अमेरिकेत सध्या मध्यावधी निवडणुकांचे वारे वाहताहेत. बराक ओबामा यांनी शुक्रवारी येथील एका प्रचार सभेला संबोधित करत मतदारांना ट्रम्प प्रशासनाविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले. 'आपल्या नेत्यांनी मागील अनेक वर्षांपासून देशात भय व द्वेषाला खतपाणी घातले आहे. दुर्दैवाने या द्वेष व संताप रिपब्लिकन पक्षात स्थान मिळाले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज याच द्वेषाचा फायदा घेऊन आपली खुर्ची मजबूत करत आहेत. ते केवळ जनतेतील भय, संताप व द्वेषाला हवा देण्याचे काम करत आहेत.
त्यामुळे आपण नाझी विचारसरणीविरोधात ज्या प्रकारे आवाज उंचावला, अगदी त्याप्रमाणे आपल्याला भेदभाव व द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना सत्तेतून पायउतार करावे लागेल,' असे ओबामा म्हणाले. 'मागील काही दिवसांतील बातम्यांवर नजर टाकली तर ही निवडणूक का वेगळी आहे, हे तुमच्या लक्षात येईल. यावेळी आपले सर्वकाही पणाला लागले आहे. देशात असामान्य व धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे आपल्यातील एखादा व्यक्ती मतदानापासून दूर राहिला तर अडचणी अधिकच वाढण्याचा धोका आहे. आपल्याला राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात बसलेल्या व्यक्तीला तेथून घालवून द्यावे लागेल,' असेही ते यावेळी ट्रम्प व सत्ताधारी रिपब्लिकन पक्षावर निशाणा साधताना म्हणाले. दरम्यान, अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर बराक ओबामा सक्रिय राजकारणातून बाहेर पडले होते. विशेषत: त्यांनी आतापर्यंत केव्हाही ट्रम्प यांच्यावर अशी टीका केली नव्हती. मात्र, यावेळी त्यांनी ट्रम्प यांचे राजकारण फेटाळून थेट त्यांना सत्तेतून बेदखल करण्याचेच आवाहन केले आहे..

No comments:
Post a Comment