बीड (प्रतिनिधी): आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लोकार्पण दि.२३ सप्टेंबर रोजी रांची झारखंड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. बीड जिल्हा पातळीवर या योजनेचे लोकार्पण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. या योजनेत जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ४२४ कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकार्पण सोहळ्यास आ. भिमराव धोंडे, आ.संगीता ठोंबरे,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, प्रभारी निवासी उप जिल्हाधिकारी प्रवीणकुमार धरमकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
बीड जिल्ह्यात या योजनेत ग्रामीण भागातील १ लाख ५७ हजार ८६१ तर शहरी भागातील ३७ हजार ५६३ अशा एकूण १ लाख ९५ हजार ४२४ कुटुंबाची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महापालिकांची रुग्णालय सहभागी होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात खाजगी रुग्णालयांचाही सहभाग होणार आहे. या योजनेत प्रति कुटुंब प्रतिवर्ष ५ लाखाचे विमा संरक्षण मिळणार आहे. ग्रामीण भागातील भुमिहीन शेतकरी, अनुसूचित जाती, जमाती वर्गातील कुटुंबे व शहरी भागातील घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, फेरीवाले यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेत १३०० पेक्षा जास्त आजारांचा समावेश करण्यात आला असून दुर्धर आजार कर्करोग, मधुमेह, रक्तदाब, ह्रदय शस्त्रक्रिया इत्यादीचा समावेश आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या योजनेचा सर्वसामान्य जनतेला लाभ होणार असून या योजनेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे..

No comments:
Post a Comment