उद्योजकाची जडणघडण

Monday, September 3, 2018

उद्योजक होणं सोपं नसतं असं विधान सर्रास वाचनात येतं. या विधानाच्या खोलात जाऊन पाहिल्यास संयम, धैर्य, जोखीम स्वीकारण्याची वृत्ती आणि समर्पण नसेल तर उद्योगाच्या वाटेवर अनेक अडथळे येतात, हे दिसून येतं. अनेकदा घरात उद्योगाची कुठलीही परंपरा नसलेले लोकही यशस्वी झालेले दिसून येतात. अनेक अडचणी सहन करत आणि धक्के खात, अपयश पचवून शेवटी यशस्वी होतात. या प्रवासात आलेले अनेक अनुभव हेच त्यांचे मार्गदर्शक असतात आणि त्या अनुभवातूनच त्यांची जडणघडण होत असते. मात्र, आता हेच उद्योजकतेचे धडे कॉलेजात घेता आले तर त्यांची वाटचाल अधिक सुकर होते आणि बसणारे धक्के कमी होतात. काही वेळा अशा उद्योजकांची वाटचाल इतकी संघर्षमय असते की त्यांना यश मिळेपर्यंतच शक्ती संपून जाते. त्यांना आपल्या हयातीत यशाची फळे चाखता येत नाहीत. त्यांची पुढची पिढी ते सर्व लाभ घेते. अशा लोकांना उद्योजकतेचे धडे मिळाले असते तर त्यांना २० वर्षांत मिळालेले यश १० वर्षांत संपादन करता आले असते, असाही एक विचार डोकावून जातो. .

या विद्याशाखेचे शिक्षण नेमके कसे द्यावे याची निश्चिती करण्यात आलेली नसल्याने अनेक संस्था आपापल्या परीने त्याचे शिक्षण देतात. काही संस्थांनी हा व्यवस्थापन शास्त्राचाच एक विषय केला आहे तर काहींनी एमबीएनंतर केवळ याच विषयाला वाहिलेला पदविका किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केला आहे. काही संस्थांनी बारावीनंतर या विषयाला वाहिलेली पदवी निर्माण केली आहे. पुण्यात सिंबायोसिसमध्ये हा अभ्यासक्रम आहे. मात्र, भारती विद्यापीठाने १९७८ मध्ये सर्वप्रथम इ्स्टिटट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड एन्टरप्रिनरशिप ही संस्था निर्माण करून या विषयाचा अभ्यासक्रम सुरू केला. इतक्या आधी या नावीन्यपूर्ण विषयाला हात घालण्याचे श्रेय भारती विद्यापीठाला जाते. सुरुवातीला ही संस्था पुणे विद्यापीठाशी संलग्न होती, पण २००१ पासून तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. देशातल्या नामवंत समजल्या जाणाऱ्या इंडियन इ्स्टिटट्युट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या अहमदाबाद, बंगळुरू, कोझीकोडे, लखनौ, रांची, कोलकाता, शिलाँग इत्यादी भागातल्या सर्व शाखांत उद्योजकतेशी संबंधित अभ्यासक्रम आहेत. दिल्लीच्या जामिया मीलिया इस्लामिया या संस्थेत तसेच आयआयएफटी नवी दिल्ली या संस्थेतही या विषयाशी संबंधित अभ्यासक्रम आहेत. सोलापूरजवळच्या वडाळा येथील श्रीराम शिक्षण संस्थेनेही बारावीनंतरचा बी.एस.सी. (उद्योजकता) हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे.

No comments:

Post a Comment