डीजेचा दणदणाट नाहीच : हायकोर्ट

Friday, September 21, 2018

मुंबई दि 
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे वाजवण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जनावेळी डीजेचा दणदणाट होणार नाही. ध्वनी प्रदुषणाचे कारण देत न्यायालयाने ही परवानगी नाकारली असून 'पाला' या संघटनेस दिलासा देण्यास नकार दिला आहे. या याचिकेवर अंतिम सुनावणी 4 आठवड्यांनी होणार आहे.

तर 'पाला' या संघटनेने गणेशोत्सवपुरता तातडीने अंतरिम दिलासा देण्याची विनंती कोर्टाला केली. मात्र खंडपीठाने ही विनंती फेटाळून लावणारा निर्णय अंतरिम आदेशात दिला. या अंतरिम आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागता यावी यासाठी संघटनेने त्याला तात्पुरती स्थगिती देण्याचीही विनंती केली. त्याला राज्य सरकारने विरोध दर्शवला. त्यानंतर खंडपीठाने ती विनंतीही फेटाळली आणि याचिकेवरील अंतिम सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली. त्यामुळे यंदाच्या गणेश विसर्जनावेळी डीजेचा दणदणाट होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल आज देण्याचं मुंबई उच्च न्यायालयानं ठरवलं होतं. न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने हा निकाल जाहीर केला.

ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादेत राहून डीजे आणि डॉल्बी सिस्टिमचा वापर करणाऱ्यांवर बंदी का? असा सवाल करत प्रोफेशनल ऑडियो आणि लायटिंग असोसिएशन (पाला) या संघटनेनं अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने हा निर्णय दिला.

No comments:

Post a Comment