- ऑक्टोबर महिन्यात जिल्हास्तरीय आरोग्य मेळावा
- जिल्हा कॅन्सरमुक्त अभियानाची सुरुवात
लातूर /प्रतिनिधी :विवेकानंद रुग्णालयाच्या पुढाकारातून लातूर जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याचा संकल्प आपण केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे आणि नागरिकांना सुखा -समाधानाने जीवन जगता यावे यासाठी ऑक्टोबर महिन्यात जिल्हास्तरीय आरोग्य मेळावा घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले .
लातूर तालुका कर्करोग नियंत्रण जनजागृती अभियान, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपसंचालक, आरोग्य सेवा मंडळ लातूर, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य विभागाच्या सहाय्याने आणि विवेकानंद संशोधन संस्थेच्या पुढाकारातून तालुक्यातील तांदूळजा येथे आयोजित कर्करोग निदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ . अशोकराव कुकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश कराड ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे , उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके ,जिल्हाधिकारी जी श्रीकांत ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विपीन इटनकर , विवेकानंदच्या डॉ अरुणा देवधर ,जि .प .सदस्या मनीषा वाघमारे ,तांदुळज्याच्या सरपंच कांबळे यांची मंचावर उपस्थिती होती .
उद्घाटनपर भाषणात बोलताना पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की ,विविध सामाजिक प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करू नये .आरोग्य सुविधा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. कर्करोग निदान उपक्रम प्रत्येक जिल्हा परिषद गटात व्हावा यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे .लातूर जिल्हा कर्करोग व अंधत्व मुक्त करण्याचा संकल्प आपण केलेला आहे.हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी विवेकानंद परिवाराचे मोठे सहकार्य मिळत असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी विवेकानंदचे विशेष आभार मानले .
ते म्हणाले की राज्य सरकारच्या माध्यमातून दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांना आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजेत .तो त्यांचा अधिकार आहे .हा अधिकार आणि योजनांचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी आपण लाईफ लाईन एक्सप्रेस हा उपक्रम राबवला .यापुढेही आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ऑक्टोबर महिन्यात जिल्हास्तरीय आरोग्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे .या मेळाव्यात सर्व प्रकारच्या आजारांचे निदान व उपचार केले जाणार आहेत. लातूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रशासनाने विविध योजनांचा लाभ दिव्यांगाना मिळवून देण्यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे .केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विवेकानंद रुग्णालयामध्ये दुर्धर आजारांवरील उपचारांच्या सुविधा उपलब्ध आहेत. वैद्यकीय सेवा पुरवण्यात विवेकानंद परिवार नेहमीच आघाडीवर आहे .या सेवेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे सांगतानाच सातबारा असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळेल असेही पालकमंत्री म्हणाले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी कुठल्याही समस्येचा अंत कसा करायचा याची शिकवण कुकडे काकांकडून मिळाल्याचे सांगितले. काकांच्याच पुढाकारातून जिल्ह्यातील कर्करोगाचा अंत करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे .या उपक्रमासाठी शासकीय नियमांची अडचण होती .परंतु त्यावर मात करून उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे .कॅन्सर हा आजार कोणालाही होऊ शकतो .हा आजार गरीब व श्रीमंत असा भेद करत नाही.
कर्करोगामुळे नागरिकांचे आयुष्यमान कमी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आयुष्यमान भारत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे .त्याच्या पूर्ततेसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. अशोकराव कुकडे म्हणाले की शासन संस्था आणि लोकसहभागाच्या माध्यमातून कर्करोग मुक्तीसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. राज्यासाठी हे एक आदर्श उदाहरण आहे .इच्छाशक्ती असल्यानंतर अडचणीवर मात करून असे उपक्रम राबविता येऊ शकतात. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा कर्करोग मुक्त होईल असा आपल्याला विश्वास आहे .एक गंभीर समस्या सोडविण्यासाठी आपण हात घातला आहे. कर्करोगाचे मूळ उखडून टाकण्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे असेही ते म्हणाले .प्रास्ताविक करताना विवेकानंद कॅन्सर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉमीरा नागावकर यांनी यापूर्वी निवळी व गंगापूर येथे अशी शिबिरे झाली असून तांदुळजा येथे होणारे हे तिसरे शिबिर असल्याचे सांगितले. डिसेंबर अखेर तालुक्यात दहा शिबिरे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
कर्करोगाची लक्षणे असणाऱ्या तालुक्यातील रुग्णांचे निदान करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. या माध्यमातून तालुका कर्करोगमुक्त केला जाईल. यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक तालुक्यात अशी शिबिरे राबवून जिल्हा कर्करोगमुक्त करण्याचा मानस असल्याचे डॉ नागावकर यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.डॉ ब्रिजमोहन झंवर यांनी विवेकानंद रुग्णालयाची वाटचाल विषद केली . या शिबिरासाठी तांदुळजा व परिसरातील रुग्णांनी मोठ्या संख्येने नाव नोंदणी केली होती. विवेकानंद रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले . उद्घाटनाच्या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment