राज्यात आधंळे बहिरे सरकार!जनसंघर्ष यात्रेचे गावोगावी जंगी स्वागत, जनतेचा प्रचंड प्रतिसाद
चोकाक जि. कोल्हापूर, दि. १
शेतक-यांच्या विहिरीतल्या पाण्यावर टॅक्स लावणा-या मोदी फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावला पाहिजे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा आज दुस-या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक येथे पोहोचली. सांगली फाटा येथे भव्य दुचाकी रॅलीने या यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर चोकाक येथे आयोजीत सभेत खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, राज्यातले आणि केंद्रातले भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात शेतक-यांना शेतीसाठी लागणा-या ट्रॅक्टरवरच्या सुट्या भागांवर आणि इतर शेती औजारांवर जीएसटी लावणा-या या सरकारने आता शेतक-यांच्या विहिरीतल्या पाण्यावर टॅक्स लावला आहे. खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणा-या मोदी फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावला पाहिजे असे खा. चव्हाण म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात विकासात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची भाजप शिवसेना सरकारने अधोगती केली आहे. शेतीमालाला भाव नाही. कर्जमाफी मिळाली नाही. शेतक-यांना पीक कर्ज मिळत नाही. नुकसानीची मदत मिळत नाही. जनतेला मदत कऱण्याऐवजी सरकार इंधनावर कर लावून सर्वसामान्यांची लूट करित आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे या भागातील पॉवरलूम व्यवसाय अडचणीत आला आहे. हजारो लोकांचा रोजगार गेला आहे. भाजप शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वच घटक अडचणीत आले आहेत. राज्यावर पाच लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. भाजप शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही त्यामुळे ते प्रश्न सोडवू शकत नाहीत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
यावेळी बोलताना माजी मंत्री आ. सतेज पाटील म्हणाले की, जनसंघर्ष यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहिल्यावर आता परिवर्तन होणार यात काही शंका नाही. या परिवर्तनामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोल्हापूर जिल्ह्याचा राहील. काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त आमदार कोल्हापूर जिल्हा निवडून देईल.
राज्याचे माजी मंत्री जयवंत आवळे व प्रकाश आवाडे म्हणाले की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आम्हा दोघांना एका व्यासपीठावर आणले. आम्ही त्यांना विश्वास देतो की आम्ही मिळून काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू.
यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ नेते व माजी खा. कलाप्पा आवाडे, माजी मंत्री आ. बसवराज पाटील, आ. डी. पी. सावंत, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, काँग्रेस सेवादलाचे राज्य संयोजक विलास औताडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, राजूबाबा आवळे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रकाश सोनावणे, विनायक देशमुख, रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे, अभिजीत सपकाळ, सचिव प्रकाश सातपुते, शाह आलम, तौफिक मुलाणी, सत्संग मुंडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment