Naxal Connection : आरोपपत्रासाठी पुणे पोलिसांना 90 दिवसांची मुदत

Sunday, September 2, 2018


पुणे : कथित नक्षलसंबंधांवरुन अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याप्रकरणी अटकेत असलेले सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, शोमा सेन, महेश राऊत यांना पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

अटक करण्यात आलेल्या या पाचही आरोपींचा २८ ऑगस्टला अटक केलेल्या आरोपींशी संपर्क होता, अशी माहिती पुणे पोलिसांसमोर आली आहे. त्याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी वेळ मागितला होता. त्यामुळे कोर्टाने ही ९० दिवसांची मुदतवाढ दिली.

गेल्या ३१ डिसेंबर रोजी पुण्यातील शनिवारवाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळला होता. या परिषदेला माओवाद्यांकडून आर्थिक पुरवठा झाल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी सुधीर ढवळे, प्रा. शोमा सेन, रोना विल्सन, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत यांना अटक केली. या आरोपींच्या दोन ते अडीचशे ईमेलची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर २८ ऑगस्टला अटक केलेले वरवरा राव, अरुण परेरा, गौतम नवलाख, सुधा भारद्वाज आणि वर्नोन गोन्साल्विस हे पाच जण ढवळे, प्रा. सेन, अ‍ॅड. गडलिंग, राऊत यांच्या संपर्कात असल्याची माहिती या पडताळणीतून समोर आली.

अटक केलेले सर्वजण सीपीआय या बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रीय सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून कागदपत्रे, पेन ड्राईव्ह, सीडी, डीव्हीडी, हार्ड डिक्स, सिम कार्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्या तपासासाठी मुंबई फॉरेंसिक लॅबकडे तपासासाठी पाठवल्या आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशात बेकायदा अ‍ॅक्टीव्हिटी करत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना नक्षली भागात नेवून प्रशिक्षण देत होते. त्यांच्या फेसबुक, ई-मेलचा तपास सुरू आहे, यासाठी दोषारोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ द्यावी, असे पोलिसांनी दिलेल्या अर्जात नमुद करण्यात आले आहे, 

शहरी नक्षलवाद हा जंगलातील नक्षलीपेक्षा गंभीर व व्यापक स्वरूपाचा आहे. आधीचे पाच आरोपी आणि नुकतेच अटक करण्यात आलेले तीन अशा एकूण आठ आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेला डेटा हा मोठ्या प्रमाणात असून त्या त्याचे विश्लेषण करण्याचे काम सुरू आहे. त्यातील काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसची क्लोन कॉफी देखील प्राप्त झाली आहे. आरोपींचे बँक खाते तपासण्यात येत असून त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मोबाइलद्वारे त्यांनी ज्या ज्या व्यक्तींशी संवाद साधले आहेत त्यातून काही माहिती उपलब्ध होत आहे का याचा तपास सुरू आहे, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केला.

No comments:

Post a Comment