2500 कोटी व्यवसायाचा उस्मानाबाद जनता बँकेचा निर्धार

Monday, September 10, 2018


मागच्या आर्थिक वर्षात 22 कोटी नफा 

 उस्मानाबाद :उस्मानाबाद जनता सहकारी बँकेला २०१७ - १८ या आर्थिक वर्षात 22 कोटी रुपये नफा झाला असून सभासदांना आठ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेने अडीच हजार कोटी रुपये बँकिंग व्यवसाय करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष बी एस मोदाणी यांनी सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.

 बँकेची सर्वसाधारण सभा श्री संत ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात बँकेचे अध्यक्ष मोदाणी  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत मोदाणी यांनी ही माहिती दिली .आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी अस्थिरता, औद्योगिक मंदी ,व्याज दरातील चढ-उतार ,नोटाबंदी, जीएसटी यावर मात करून बँकेने मागच्या आर्थिक वर्षात 2173.70 कोटी व्यवसाय केला .पुढील वर्षात हा व्यवसाय अडीच हजार कोटी रुपये करण्याचा प्रयत्न आहे असे मोदाणी  म्हणाले . मागील सहा वर्षांपासून बँक नफ्यात आहे .मागच्या आर्थिक वर्षात बँकेला 22 कोटी 16 लाख रुपये नफा झाला असून यातून सभासदांना 8% लाभांश  देण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेने सर्व क्षेत्रात दहा टक्क्याहून अधिक प्रगतीचा प्रयत्न केला आहे.

 बँकेच्या महाराष्ट्रसह कर्नाटकातही शाखा आहेत. राज्यात 28 तर कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात दोन शाखा आहेत .उस्मानाबाद ,लातूर, बीड ,सोलापूर ,अहमदनगर आणि कर्नाटकातील बिदर जिल्हा बँकेचे कार्यक्षेत्र आहे. बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी कार्यक्षेत्रातील नागरिकांनी बँकिंगचा लाभ घ्यावा असे मोदाणी  म्हणाले .मागच्या वर्षात बँकेच्या अधिकृत भागभांडवलाची मर्यादा 100 कोटी रुपये झाली  असून यामुळे एका भागाची किंमत 100 रुपयांवरून पाचशे रुपये करण्यात आली आहे. सभासदानी अपूर्ण भागाची रक्कम जवळच्या बँक शाखेत जाऊन भरणा करावी असे आवाहनही मोदाणी यांनी केले. बँकेने उस्मानाबाद येथे स्वतःच्या जागेत डेटा सेंटर उभारले आहे. उदगीर येथेही स्वतःच्या जागेत डीआर साईट कार्यरत आहे .

उस्मानाबाद, लातुरातील गंजगोलाई शाखा, बार्शी ,उदगीर येथे सोलर सिस्टिम बसविण्यात आल्या आहेत. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन सी केवायसी, सेंट्रलाइज्ड क्लिअरिन्ग चेक्स , आरटीजीएस ,एन इ एफ टी ,ई-मेल ,एस एम एस, आधार लिंक ,गॅस अनुदान आदी सुविधा ऑनलाइन दिल्या जात आहेत .सर्व सभासदाना मागणीनुसार एटीएम व डेबिट कार्ड देण्यात येत आहे .व्यापारी, कर्जदार व ग्राहकांना आर्थिक देवाणघेवाणीसाठी स्वाईप मशीन चालू करण्यात आले आहेत . देशात कोठेही बँकेचे एटीएम वापरता येत असून ग्राहकांना जलद सेवा मिळत आहे .संचालक मंडळाच्या दूरदर्शी धरणामुळे मागच्या पाच वर्षात बँकेच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे .रिझर्व बँकेच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम व व उत्तम संचलित बँकांसाठी चे निकष पालन करण्यात येत आहेत. कटू कारवाई टाळण्यासाठी कर्जदारांनी वेळेत परतफेड करावी असेही मोदाणी म्हणाले. या सभेत नफा-तोटा पत्रक ,ताळेबंद पत्रक ,खर्च, ऑडिट रिपोर्ट व अहवालास मान्यता देण्यात आली .2018-  19 च्या अंदाजपत्रकास सभासदांनी टाळ्या वाजून मान्यता दिली. या सभेत ज्येष्ठ संचालक विश्वास शिंदे यांनी प्रास्ताविक केले .दिवंगत तज्ञ संचालक मोहन देशमुख ,चार्टर्ड अकाउंटंट ,ग्राहक ,हितचिंतक शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .माजी आमदार तथा बँकेचे उपाध्यक्ष वैजनाथ शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले .

यावेळी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत  नागदे, धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील ,दिलीप धोत्रे, प्रशांत चेडे ,बाजीराव शिंदे ,सुभाष गोविंदपुरकर ॲड .नळेगावकर ,शाम बरुरे ,सुधाकर व्यंजने, शिवाजीराव सिरसट ,बाबुराव बिराजदार ,सुहास पाटील, भागवतराव धस , मधुकर तावडे ,भाऊसाहेब उंबरे, शिवाजीराव गपाट संजय दुधगावकर ,अरविंद चौधरी, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शोभा वारद ,सरव्यवस्थापक एम बी गायकवाड यांची उपस्थिती होती .

या सभेत केरळमधील पूरग्रस्तांसाठी 11 लाख रुपये मदत देण्याची घोषणा चेअरमन ब्रिजलाल मोदाणी यांनी केली .उपस्थित सभासदांनी टाळ्या वाजून त्याला अनुमोदन दिले.

  • 31 मार्च 2018 अखेर बँकेची आर्थिक स्थिती
  • सभासद संख्या 72175
  • भाग भांडवल रुपये 53.54 कोटी
  • एकूण निधी 227.00 कोटी
  • ठेवी 1271.53 कोटी
  • कर्जे 902.16 कोटी
  • गुंतवणुक 612.14 कोटी
  • नफा 22.16 कोटी

No comments:

Post a Comment