लंडन : इंग्लंडच्या माऱ्यापुढे मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर भारताचा दारुण पराभव निश्चित मानला जात होता.मात्र, या परिस्थितीत लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांनी संयमी खेळीचा नजराणा सादर करत वैयक्तिक शतकांसह सहाव्या गड्यासाठी द्विशतकीय भागीदारी रचली.
परिणामी, या दोघांच्या फटकेबाजीमुळे अखेरच्या दिवशी भारताच्या विजयाचा आशा पल्लवित झाल्या. मात्र, या दोघांची जोडी फुटल्यानंतर इंग्लंडने भारताचे शेपटू झटपट गुंडाळले. परिणामी, इंग्लंडने ११८ धावांनी विजयाची नोंद करत मालिकेवर ४-१ असे निर्विवाद वर्चस्व राखले. लोकेश-पंतच्या फटकेबाजीमुळे भारताचा मोठ्या धावांच्या अंतराने होणारा पराभव टाळला गेला. लोकेशने २० चौकार व १ षटकारने १४९, तर पंतने १५ चौकार व ४ षटकारांनी ११४ धावांची खेळी सजवली.
भारताने सकाळच्या सत्रात अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीच्या रूपात दोन फलंदाज गमावले. मोईन अलीला पॅडल स्विपचा फटका मारण्याच्या प्रयत्नात रहाणे ३७ धावांवर माघारी परतला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा हनुमा विहारी कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरला आणि भोपळ्यावरच बाद झाला. त्यानंतर सकाळच्या सत्रातील उर्वरित षटके लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांनी सावधपणे खेळून काढली. लोकेश राहुलने सकारात्मक मानसिकतेने अंतिम दिवशी फलंदाजीला प्रारंभ केला. पंतने पहिली काही षटके सावधपणे खेळण्यास प्राधान्य दिले. मात्र, नंतर खेळपट्टीवर तग धरल्यानंतर पंतने आपल्या शैलीत फलंदाजी केली.
लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांची जोडी इंग्लंडच्या फिरकीचा समर्थपणे सामना करत धावा काढत होती. आदिल रशिद आणि मोईन अली यांना लक्ष्य केल्यामुळे भारताच्या धावगतीला वेग प्राप्त झाला. राहुलने उपाहारापूर्वी ११८ चेंडूंत शतक पूर्ण केले. लोकेशने शतक झळकावल्याचा आनंद साजरा करणे टाळले. गेल्या दोन वर्षांत त्याचे हे पहिले आणि एकूण पाचवे शतक ठरले. लागोपाठ नऊ डावांमध्ये अपयशी ठरल्यानंतर पहिल्यांदा त्याने ५० हून अधिक धावा काढल्या. उपाहारापर्यंत भारताने ५ बाद १६७ धावा उभारल्या..
उपाहारानंतर इंग्लंडचे गोलंदाज सुस्तावलेले दिसून आले. त्याचा फायदा घेत पंतने झटपट धावा काढण्यास पसंती दिली. परिणामी, ७८ चेंडूंत त्याने अर्धशतकाची नोंद केली. त्या तुलनेत लोकेश राहुलने एक बाजू नेटाने लावून धरली. राहुल आणि पंत खेळत असताना आकाशात अचानक ढग जमा झाले. .
लोकेश आणि पंत या जोडीने इंग्लंडला चांगलेच रडवले. त्यामुळे अखेर कर्णधार रूटनेच ही जोडी फोडण्यासाठी गोलंदाजी केली; परंतु त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. स्टोक्सच्या एकाच षटकात पंतने लागोपाठ तीन चौकार ठोकत इंग्लंडच्या गोलंदाजांच्या मर्यादा दाखवून दिल्या. पंतने आदिल रशिदला षटकार ठोकत कसोटी कारकीर्दीतले पहिले शतक पूर्ण केले. दीडशे धावांच्या उंबरठ्यावर असताना लोकेशची एकाग्रता भंग पावली आणि आदिल रशिदने त्याच्या यष्ट्यांचा वेध घेतला. लोकेश राहुल बाद झाल्यानंतर पंतचाही संयम सुटला. भारताने अंतिम तीन फलंदाज १७ धावांत गमावले..
सॅम करन मालिकावीर
विराट कोहलीने या मालिकेत पाच सामन्यांमध्ये 59 च्या सरासरीने 593 धावा केल्या. तो भारतीय मालिकावीर ठरला. तर इंग्लंडचा युवा गोलंदाज सॅम करन मालिकावीर ठरला. त्याने चार सामन्यांमध्ये 11 विकेट घेत 272 धावांची अष्टपैलू कामगिरी केली.
जेम्स अँडरसनने इतिहास रचला
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मोहम्मद शमीला बाद करताच ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 564 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज होण्याचा मान मिळवला. मॅकग्राच्या नावावर 563 विकेट्स आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (800), ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार शेन वॉर्न (708), भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे (609) यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. या यादीत चौथ्या क्रमांकावर आता अँडरसन आहे.

No comments:
Post a Comment