येत्या काळात जिल्ह्यात तीन आमदार आणि खासदार आपलेच असतील :आ. सुजितिंसंह ठाकूर

Saturday, August 11, 2018

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितिंसंह ठाकूर यांचा विश्वास 



हिंगोली / प्रतिनिधी 
ओरडणाऱ्यांना ओरडू द्या जनता आपल्या पाठीशी आहे. विरोधकांनी भाजपविरूद्ध आग पाखड करूनही भाजपाने जळगाव जिंकलेच तर सांगली महानगरपालिका नाकावर टिचून आपल्याकडे ओढली आहे. तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या बळावर भारतीय जनता पक्ष मजबुत झाला आहे. सध्या जिल्ह्यात भाजपाचे एक आमदार असले तरी आगामी विधानसभेत जिल्ह्यातील तीनही जागेवर भाजपाचे उमेदवार विजयी होतील तर हिंगोली लोकसभेची जागेवरही भाजपाचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी हिंगोली येथे शनिवारी बोलून दाखविला. दरम्यान, दैनिक मराठवाडा नेता परिवाराच्या वतीने आ. सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. 


  
येथील रामाकृष्णा हॉटेलमध्ये 11 ऑगस्ट रोजी भाजपा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संघठन मंत्री भाऊसाहेब देशमुख, आ. तानाजीराव मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खा. शिवाजीराव माने, माजी आ. गजाननराव घुगे, ऍड. शिवाजीराव जाधव, अभियंता पी.आर.देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते खंबीर आहेत. त्यांनी भाजपाला कठीण काळात साथ दिली. त्यामुळेच आज राज्यात आणि देशात फक्त कमळच फुलले आहे. येणारा काळही आपलाच आहे. बोंबलणाऱ्यांना बोंबलू द्या. हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा आमदार व लोकसभेचा खासदार भाजपाचाच असणार आहे हे त्यांनी आपल्या बोलण्यातून हसून सांगितले. इतिहासात कोण्या एका पक्षाला एवढे यश कधीच मिळाले नाही. भाजपाने करून दाखविले. विरोधक भाजपाच्या नावाने खांडे खात असताना जनतेने जळगाव भाजपाच्या ताब्यात दिले तर सांगली महानगरपालिकाही भाजपाने मिळविली. त्यामुळे आगामी काळात ज्या गोरगरीब लोकांचा आवाज दबलेला आहे. त्यांच्यापर्यंत जावून पोहचा, त्यांची कामे करा, त्यासाठी आज संकल्प करा, निर्धार करा, आघाडी सरकारने पंधरा वर्षात जेवढा निधी दिला त्यापेक्षा जास्त निधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंगोली जिल्ह्याला चार वर्षात दिला आहे. कार्यकर्त्यांना सल्ला देताना आ. ठाकूर म्हणाले की, सत्तेबरोबर स्वभावही विकसित करा. 

जिल्ह्यातील बुथ रचनेचा घेतला आढावा 
केंद्रीय कार्यकारणीने देशभरात बुथरचनेचे योग्य नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातही हे काम सुरू असून जिल्ह्यातील पाचही तालुक्याचा आ. ठाकूर यांनी आढावा घेतला. यामध्ये औंढा, वसमत, सेनगाव, हिंगोली, कळमनुरी तालुक्यातील भाजपा तालुकाअध्यक्ष, समन्वयक यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला असता हिंगोली जिल्हा बुथकमेटीत आघाडीवर असल्याचे दिसून आले. तसेच ग्रामीण भागात जावून गाव निहाय बुथनियोजन करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. 

जनतेत उजळमाथ्याने फिरा 
शहरा भागासह ग्रामीण भागात घराघरापर्यंत जावून पोहोचवा लवकरच केंद्र शासन व राज्य शासन यांच्या योजनेच्या लाभधारकांची यादी प्रत्येक जिल्हा स्तरावर पाठविली जाणार आहे. अशा लाभधारकांना भाजपा पदाधिकारी प्रत्यक्ष जावून भेटा त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या तशा सुचना जिल्हास्तरावर करा असेही ते म्हणाले. 
मराठा आरक्षणासाठी दहा विशेष अधिवेशन लावू पण... 
मराठा समाजाला भाजप सरकारच आरक्षण देणार आहे. त्यामुळे मराठा समाजाने निश्ंिचत रहावे. आघाडी सरकारने केवळ निवडणुकीच्या काळावर मराठा समाजाला फसवे आरक्षण लागू केले. त्यामुळे न्यायालयाने त्यावर स्थगिती आणली. कोणतेही ठोस पुरावे नसताना केवळ मराठा समाजाच्या मतावर डोळा ठेवून कॉंग्रेस राष्ट्रवादीने हे पाऊल उचलले. पण भाजपा सरकार असे करणार नाही. मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे यासाठी आम्ही छत्रपती शिवरायांच्या काळापासूनचे पुरावे जमा केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक काय दहा विशेष अधिवेशन लावू पण त्यासाठी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल महत्वाचा आहे. तो आला तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असे भाजपा सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर हिंगोली येथे भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना 11 ऑगस्ट रोजी म्हणाले. 

दैनिक मराठवाडा नेता परिवाराच्या वतीने आ. ठाकूर यांचा सत्कार 
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर हिंगोली येथे आले असता त्यांचा दैनिक मराठवाडा नेता परिवाराच्या वतीने विठ्ठलाची प्रतिमा देवून दैनिक मराठवाडा नेताचे जिल्हाप्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे, कपिल सावळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आ. तानाजीराव मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आ. गजाननराव घुगे, ऍड. शिवाजीराव जाधव यांची उपस्थिती होती. 

यावेळी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या समवेत आलेले संघटनमंत्री भाऊसाहेब देशमुख यांनीही कार्यकर्त्यांना पक्षवाढीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आ.मुटकुळेंनीही राज्य सरकारने जिल्ह्याला भरीव निधी देवून सिंचन अनुशेषाचा प्रश्न मार्गी लावला आहे. तसेच जिल्ह्यातील विकास कामांना गती आल्याचेही आ. मुटकूळे आपल्या भाषणात म्हणाले. या बैठकीला भाजपा नेते रामरतन शिंदे, नगरसेवक गणेश बांगर, मिलींद यंबल, फुलाजी शिंदे, उत्तमराव जगताप, डॉ. उमेश नागरे यांच्यासह महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment