हिंगोली / प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाभरात वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरू आहेत. येथील गांधी चौकात 30 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी 2 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचा फोटो ठेवून सरकारच्या नावाने जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले. यामाध्यमातून अंबाबाई-तुळजाई मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे असे साकडेही आंदोलकांनी घातले.
आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार घेणार नाही असा पवित्रा जिल्हाभरातील आंदोलकांनी घेतला आहे. ठिकठिकाणी रास्ता रोको टायरची जाळपोळ करून आंदोलक आपला रोष व्यक्त करत आहेत. त्याचाच भाग म्हणून येथील गांधी चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते. सर्कल निहाय गावाचे नियोजन केल्याने दिवसेंदिवस ठिय्या आंदोलनाला गर्दी वाढल्याचे दिसते. रोजच नाविन्यपुर्ण रित्या आंदोलन केले जात असताना 2 ऑगस्ट रोजी दिवसभर मराठा समाजबांधवांनी पारंपारिक गोंधळ, जागरण आंदोलन केले. यामध्ये गोंधळी-गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी, गोंधळी-गोंधळी आम्ही मराठा गोंधळी असा ठेका धरत देवी अंबाबाई, देवी तुळजाई मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी दे असे साकडेही उपस्थितांनी घातले. हे गोंधळ आंदोलन लक्षवेधी ठरले.
तर आज 3 ऑगस्ट रोजी मुंडण आंदोलन करून शासनाचा निषेध करण्याचे ठरले आहे. दरम्यान, चालू असलेल्या या ठिय्या आंदोलनाला जिल्हा वकील संघाने पाठींबा दर्शविला असून वकील संघाचे सर्वच पदाधिकारी आंदोलन स्थळी स्वत: उपस्थित होते. मराठा आंदोलनादरम्यान, आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे निशुल्क लढविण्यात येतील असेही वकील संघाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच 7 ऑगस्ट रोजी याच मंडपात महिलांचे ठिय्या आंदोलन होणार आहे. दिवसेंदिवस ठिय्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद पाहता येत्या काळात आरक्षणाचा विषय गंभीर होईल असे चित्र दिसत आहे.
No comments:
Post a Comment