लातूर जिल्हा दुष्काळमुक्त होणार

Wednesday, August 8, 2018

किल्लारी येथून जलयुक्तच्या कामांचा शुभारंभ;
मुख्यमंत्री फडणवीस व  शरद पवार यांची उपस्थिती

लातूरःप्रतिनिधी
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून लातूर जिल्हयात जलसंधारणांची कामे मोठया प्रमाणात घेण्यात आली. तसेच इंद्रप्रस्थ् जलभूमी अभियानांतर्गत  पंचनिष्ठाची ही प्रभावी अंमलबजावणी होत आहे.या अभियानात मोठया प्रमाणात लोकसहभाग मिळाल्याने लातूर जिल्हयाची वाटचाल ही दुष्काळमुक्तीकडे सुरू आहे.याच अभियानात भारतीय जैन संघटना आवश्यक तेवढया मशीनरी उपलब्ध करणार असल्याने १५ जून २०१९ पर्यंत संपूर्ण लातूर जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यात येईल,असे प्रतिपादन कामगार कल्याण,कौशल्य विकास,भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जलयुक्त शिवार अभियानास भारतीय जैन संघटनेचे सहकार्याबाबतचा आढावा बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे,भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, जिल्हा समन्वय सुनील कोचेटा,निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके,समाज कल्याण सभापती संजय दोरवे,बांधकाम सभापती प्रकाश देशमुख,कृषी सभापती बजरंग जाधव आदि उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, लातूर जिल्हयाची ओळख ही भूकंप व टंचाईचा जिल्हाअशी नकारात्मक झालेली आहे. ही ओळख पुसून टाकण्यासाठी लातूरकर नागरिक जलयुक्तच्या कामात एकत्रित येवून सांघिकपणे प्रशासन व शासनाला सहकार्य करत आहेत.त्यामुळेच जिल्हा जलयुक्त शिवार अभियानात यशस्वी झाला आहे.तसेच इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानांतून जो पंचनिष्ठ कार्यक्रम घेण्यात येत आहेत त्या कार्यक्रमास ही चांगला प्रतिसाद मिळत असून या कार्यक्रमाची केंद्रीय स्तरावर दखल घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत यावर्षी भारतीय जैन संघटना जिल्हयातील सर्व कामांसाठी मोफत मशिनरी पुरवठा करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गावे पाणीदार करण्यासाठी प्रशासनाने  योग्य नियोजन करावे.त्याकरिता तालुकानिहाय कार्यशाळा घेऊन प्रत्येक गावाचे जलनियोजन तयार करुन लातूर जिल्हा दि.१५ जून २०१९ पर्यंत कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत व या कामांची सुरूवात दि.३० सप्टेंबर २०१८ रोजी किल्लारी येथून करण्यात येईल,असे पालकमंत्री निलंगेकर यांनी सांगितले.

किल्लारी येथे ३० सप्टेंबर २०१८ रोजी जलयुक्तच्या कामांचा शुभारंभ् करून लातूर जिल्हयाची वाटचाल दुष्काळमुक्तीकडे करण्यात येणार आहे.या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी केद्रींय मंत्री शरद पवार,माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर व शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांनी निमंत्रण स्वीकारले असल्याची माहिती श्री.निलंगेकर यांनी दिली.

बुलडाणा येथील भारतीय जैन संघटनेने जलयुक्त अंतर्गत लातूर जिल्हयातील सर्व गावे कांमासाठी निवडलेली आहेत. ही संघटना मशिनरी पुरवठा करणार असून लातूर जिल्हा पाणीदार करण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले.भारतीय जैन संघटनेचे मुथा यांनी त्यांच्या संघटनेचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत केलेल्या कामांची  माहिती सांगून लातूर जिल्हयातील जलसंधारणाच्या कामांसाठी आवश्यक तेवढया मशिनरी उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही दिली.       

No comments:

Post a Comment