हिंगोली / प्रतिनिधी
गेल्या महिन्याभरापासून हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. ठिय्या, धरणे, रास्ता रोको अशा विविध पद्धतीने आंदोलने छेडली गेली आहेत. त्यातच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत डोंगरकडा येथे सर्वच राजकीय पुढाऱ्याला गावबंदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे असा ठरावही डोंगकडा ग्रामपंचायतने घेतला आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार, खासदार, मंत्री यांना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी करण्यात येत असल्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने अनेक गावांत पुढाऱ्यांना गावबंदी असे फलकही मुख्य चौकात लावले आहेत, असे असताना विशेष म्हणजे कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील ग्रामपंचायतीने चक्क राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असा अधिकृत ठराव घेतला आहे. या गावबंदीमध्ये गावातील स्थानिक राजकीय नेते सोडले तर पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जि.प.अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री या सर्वांनाच गावबंदी करण्यात आली आहे. याबाबत 15 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत पंजाबराव व्यंकटराव अडकिणे यांनी सुचक म्हणून असा ठराव मांडला होता. याला बापूराव माधवराव अडकिणे यांनी अनुमोदक दिले. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच मराठा समाजावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठीही ठराव घेण्यात आला. तोही ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यासाठी अधिकृतपणे ठराव घेणारी जिल्ह्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment