आम्हाला हिंसक बनवू नका

Wednesday, August 8, 2018


रणरागिणीचे मानवी साखळी करत गांधीजींना रिंगण, उद्या हिंगोली बंदची हाक
हिंगोली / प्रतिनिधी 
येथील महात्मा गांधी चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने 30 जुलैपासून आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या नवव्या दिवशी 6 ऑगस्ट रोजी महिलांनी ठिय्या दिला. यावेळी पोवाडे सादर करण्यात आले. तसेच येथील महात्मा गांधी पुतळ्याला महिलांनी मानवी साखळीचे रिंगण करून अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घ्यावी. आम्हाला हिंसक बनवू नका, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

      मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाभरात गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. याचाच भाग म्हणून येथील महात्मा गांधी चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनाच्या नवव्या दिवशी मंगळवारी सकाळपासूनच शेकडो महिलांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पोवाडे गाण्यात आले. यावेळी महिला, युवतींची आक्रमक भाषणेही झाली. मुख्यमंत्र्यांच्या फोटोसमोर महिलांनी बांगड्या फेकत मुख्यमंत्री बांगड्या घालण्याच्याही लायकीचे नाहीत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना बांगड्या पाठविणार नाहीत, असा पावित्राही यावेळी महिलांनी घेतला. यावेळी एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणांनी गांधीचौक परिसर दणाणून गेला होता. दुपारी 3े च्या सुमारास शेकडो महिलांनी गांधीजींच्या पुतळ्याला मानवी साखळी करत रिंगण घातले. अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मराठा समाजाला हिंसक आंदोलन करण्यास प्रवृत्त करू नये, असा इशाराही यावेळी महिलांनी दिला. महिलांनी दिवसभर केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे मंगळवारी बाजाराचा दिवस असल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. दरम्यान, पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही महिलांनी शासनाचा निषेध म्हणून काळ्या साड्याही परिधान केल्या होत्या.



मोर्चेकऱ्यांनी आयुक्तांचे निवेदन फेटाळले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार औरंगाबाद विभागाच्या आयुक्तांनी हिंगोली येथील सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला निवेदन सादर केले आहे. यामध्ये राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सहानुभुतीपूर्वक विचार करीत असून, लवकरच मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या जातील, असे नमूद केले होते. आयुक्तालयातून आलेले हे निवेदन हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी प्रत्यक्ष ठिय्या आंदोलनस्थळी येवून मोर्चातील समन्वयकाकडे दिले. पण, मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर होईपर्यंत हे ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पावित्रा सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला असून, आयुक्तांच्या निवेदनानंतरही ठिय्या आंदोलन सुरूच आहे.

आज आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न विधानसभेत लावून धरावा, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे यासाठी पुढाकार घ्यावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यातील मराठा आमदारांच्या कार्यालयासमोर आज 7 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.

उद्या हिंगोली जिल्हा बंदची हाक
मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रच्या वतीने 9 ऑगस्टला बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद हिंगोली जिल्ह्यातही पाळण्यात येणार असून, याबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन, गुरं-ढोरं, लेकरांबाळांसह रस्त्यावर ठिय्या, बैलगाडी, ट्रॅक्टर रस्त्यावर मांडण्यात येणार आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील सर्वच बाजारपेठा, शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. 


No comments:

Post a Comment