कर्मचाऱ्यांच्या संपाने शासकीय कार्यालये ओस

Wednesday, August 8, 2018


 
सातवा वेतन आयोग लागू करून दिवाळी गोड करा 
हिंगोली / प्रतिनिधी  
कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 7 ऑगस्ट रोजी संप पुकारला आहे. यामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसत होता.  प्रामुख्याने दिवाळीपुर्वी शासनाने सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी पुढे येत आहे. हा संप 9 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. 

       या संपात महसूलचे कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आदींनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, केंद्रा प्रमाणे पाच दिवसाप्रमाणे आठवडा करण्यात यावा, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता व थकबाकी रक्कम तातकाळ अदा करावी, महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंगोपनाची रजा मान्य करावी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीबाबत परिणामकारक कायदा करावा,  शासकीय सेवेत असताना मृत्यू, अपंगत्व अथवा वैद्यकीय दृष्ट्या अपात्र झालेल्यांना वैद्यकीय खर्च द्यावा तसेच कुटूंबातील एकास अनुकंपा तत्वावर सेवा, सुविधा देण्यात यावी, सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावेत, सुधारित आकृतीबंद काढण्यात यावा, अधिकाऱ्यांकडील शासकीय वाहनांचा विमा काढण्यात यावा, शिपाई संवर्गातील 25 टक्के पदे कमी करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन महसूल विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्राचे महसूल कर्मचारी संघटनेच्या या निवेदनावर एस.एम. तत्तापुरे, जी.एस.कंठे, अजिंक्य पंडीत, ए.बी.गायकवाड, एस.व्ही. झाटे, एस.बी. पिसाळ, डी.एस.निमजे, आर.एस.मुकाडे, के.एम.भिसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचाही संप 
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संघानेही 7 ऑगस्ट रोजी एकदिवशीय संप केला आहे. यामध्ये संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. ज्यामध्ये सातवा वेतन लागू करण्यापुर्वी लिपीक, लेखा, परिचर, वाहनचालक, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दुर करून दिवाळीपुर्वी सातवा वेतन आयोग लागू करावा, सातवा वेतन आयोग लागू करण्यापुर्वी गणेशोत्सवादरम्यान 25 हजार आयोगापोटी ऍग्रीम द्यावे, जि.प.अंतर्गत वाहनचालकांची पदे पुर्ववत ठेवण्यात यावी यासह आदी तेरा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर संतोष बांगर, शाम बांगर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीनेही या संपात सहभाग नोंदविला आहे. 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार आहे, असे निवेदनही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment