हिंगोली / प्रतिनिधी
मराठा कुणबी एकच आहेत, असे शेकडो पुरावे आम्ही सरकारकडे दिले आहेत. तसेच राज्य मागासवर्गीय आयोगाकडे मागास म्हणून समजल्या जाणाऱ्या 13 निकषाबाबत 11 निकष पुराव्यानिशी मांडले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे. ती केवळ सरकारच्या मानसिकतेची पण सरकार आरक्षणाबाबत चालढकल करीत आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांनी हिंगोली येथे बोलताना केला.
आजपर्यंत महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी 33 जणांनी आत्महत्या केल्या़ राज्यात जवळपास 10 हजार आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल झाले़ राज्य सरकार याउपर ही मराठा समाजाच्या मागण्याकडे लक्ष देईलच का नाही यात शंका आहे़ राज्य सरकारकडे आम्ही वेळोवेळी मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, याचे पुरावे दिले आहेत़ आता मराठा समाजातील काही प्रमुख मंडळीनी आयोगाला असे पुरावे पुन्हा एकदा सादर करावेत़ आंदोलन अधिक उग्र करण्यापेक्षा आयोगाकडे मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत हे पुरावे सादर करणे आवश्यक असल्याचे विचार ही त्यांनी व्यक्त केले़ केंद्र सरकार व राज्य सरकार हे आजपर्यंत कुठलेच आश्वासन पुर्ण करू शकले नाही़ एवढ्यावर ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रसिध्द होत आहेत असे दाखविल्या जाते़ पण हे पुर्णपणे चुकीचे आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुर्णपणे ओबीसी समाजाला एकत्र आणून वर्षे 2019 च्या निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे अशीही माहिती त्यांनी दिली़
संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्यात एकूण संभाजी ब्रिगेड नावाच्या पाच संघटना आहेत़ मराठा सेवा संघाची निगडीत असलेल्या एका संभाजी ब्रिगेडकडे सामाजिक काम आहे तर त्यानंतर स्थापन झालेल्या संभाजी ब्रिगेडकडे राजकीय धुरा आहे़ राजकीय धुरा सांभाळणाऱ्या संभाजी ब्रिगेडने राज्यात 288 आमदार निवडून आणावेत आम्ही त्यांना सहकार्य करण्यास तयार आहोत़ शिवाय सामाजिक संघटनेचे काम करत असलेले संभाजी ब्रिगेड त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील असे ही त्यांनी सांगितले़ मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारची भूमिका असेल अशी माहिती विचारली असता, गायकवाड म्हणाले की, राज्य सरकार हे मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण करेल की नाही यात पुर्णपणे शंका आहे़ खरे सांगायचे झाल्यास राज्य सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मानसिकतेत नाही असे ही विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले़ यावेळी शेकाप नेते संतोष गव्हाणे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढोकर पाटील, संजय टाकळगव्हाणकर आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment