हिंगोली / ज्ञानेश्वर लोंढे
सरकारने आरक्षण नाही दिलं तर आपण ते मिळवू, जर तुम्हीच लढाई अर्ध्यावर सोडून आत्महत्या करत असाल तर हे आरक्षण काय कामाचे? असा सवाल उपस्थित करत तिरडीवरचे आरक्षण आम्हाला नकोय, असे म्हणत मराठ्यांनो आरक्षणाची लढाई सुरू आहे, हिंमत ठेवा, आत्महत्या करू नका असे आवाहन आ. हर्षवर्धन जाधव यांनी हिंगोली येथे बोलताना केले.
हिंगोली येथे सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला आ. हर्षवर्धन जाधव यांनी 12 ऑगस्ट रोजी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत समुपदेशक डॉ. इशा झा, विलास तांगडे, भागवत देवसरकर, संगमेश्वर लांडगे उपस्थित होते. पुढे बोलताना आ. हर्षवर्धन जाधव म्हणाले की, मी आमदारकीचा राजीनामा दिला म्हणजे फार मोठे काम केले नाही. मी कन्नडचा आमदार होतो. भविष्यात सुद्धा कन्नडचाच आमदार राहणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आपणा सर्वांना लावून धरायचा आहे. त्यासाठी हिंमत धरा कुणीही आत्महत्या करू नका, जर मावळेच जीव देत असतील तर आरक्षण कशासाठी, तुम्ही ही लढाई अर्धवट सोडून चालणार नाही, त्यामुळे आपण खंबीरपणे जगले पाहिजे, आरक्षणासाठी आवाज उठविला पाहिजे, मुख्यमंत्र्यांना लाज वाटत नाही. इकडे मराठा सैनिक आत्महत्या करत असताना मुख्यमंत्री हसरे फोटो काढतात अशी टिकाही आ. जाधव यांनी केली.
त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी गावा गावात जावून पक्षाच्या शाखेच्या माध्यमातून समुपदेशन केले पाहिजे. ठिय्या आंदोलनातील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हा विषय महत्वाचा समजुन ग्रामीण भागात जनजागृती करावी, आज आरक्षणाचा विषय आपल्यासाठी दुय्यम झाला आहे. सर्वप्रथम आपल्या लोकांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आपणा सर्वांना काम करावे लागणार आहे. सरकारही मराठा आरक्षण आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आंदोलकांतील कार्यकर्त्यांवर 307, 353 अशा स्वरूपाच्या कलमा लावत आहेत. ब्रिटीश राजनिती वापरून आंदोलन दडपण्याचा डाव सरकारचा सुरू आहे. हे करण्याऐवजी सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढायला हवा. ते होत नसेल तर किमान राज्य पातळीवरून आत्महत्या रोखण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. पण सरकार केवळ बघ्यांची भुमिका घेत आहे, असे आ. जाधव म्हणाले.
आपल्याला माणसं मारून नाही तर माणसं जगवून जिंकायचे आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नका असे म्हणताना ते भावूक झाले होते. 15 ऑगस्ट रोजी मंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदनाबाबत बोलताना ते म्हणाले की, सरकार जर मराठा आरक्षणाविषयी संवेदनशील असेल एकदा मंत्र्यांनी झेंडावंदन नाही केला तर काय फरक पडतो. त्यामुळे मराठा समाजाची मागणी असेल तर कोण्याही मंत्र्यांनी 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदन करू नये. त्याऐवजी प्रशासकीय अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक यांच्या हस्ते करण्यात यावे असे आ. हर्षवर्धन जाधव यांनी हिंगोली येथे बोलताना आपले मत व्यक्त केले.
आयुष्य सुंदर आहे, तुम्ही जगा- डॉ.इशा झा
आ. हर्षवर्धन जाधव यांच्या समवेत नामांकित डॉ. इशा झा या आत्महत्या बाबत जनजागृती करण्यासाठी समुपदेशन करण्यासाठी हिंगोली येथे आल्या होत्या. मार्गदर्शन करताना डॉ. इशा झा म्हणाल्या की, आपल्याला अभ्यासक्रमांत शुरविरांचे धडे दिले जातात. ते केवळ आपण ते वाचुन परिक्षा पास करण्यासाठी नव्हे तर आयुष्याची परिक्षा पास करण्यासाठी असतात. हे आपण शिकलं पाहिजे, छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी घेतलेले कष्ट आपणाला प्रेरणादायी आहेत. हे आपण समजुन घेतले पाहिजे. त्यामुळे कुणीही आत्महत्येचा मार्ग स्विकारता कामा नये. ज्या भगवंतांनी, देवाने, अल्लाने, निसर्गाने हे सुंदर आयुष्य दिलं आहे. याचा सन्मान करा, परत परत हे आयुष्य मिळत नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संघर्षाने उभे रहा त्यामुळे आत्महत्येचा विचार आपल्या कुणाच्या मनाला शिवणार नाही. आत्महत्या हा कधीच कोणत्याच गोष्टीचा पर्याय नव्हता. भविष्यातही तो राहणार नाही त्यामुळे हिंमतीने उभे रहा, छत्रपती शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर आणा. आत्महत्या करू नका असे आवाहन प्रसिद्ध समुपदेशक डॉ. इशा झा यांनी हिंगोली येथे ठिय्या आंदोलनात केले
No comments:
Post a Comment