कोणालाच आरक्षण नको, फ्री सोसायटी करा आ. हर्षवर्धन जाधव यांचे मत

Saturday, August 11, 2018



लातूर / प्रतिनिधी 
मताचे राजकारण करून सत्ता हस्तगत करण्यासाठी राजकीय पक्षत्तंनी आरक्षणाचा वापर केला. परिणामी आज सारेच समाज आरक्षणाची मागणी करत आहेत, त्यासाठी एकमेकांचे खुन करत आहेत. स्वत:चे जीव देत आहेत, त्या दृष्टीने आरक्षण हे राजकीय पक्षाचे पाप असून कोणालाही कसल्याही  प्रकारचे आरक्षण देवू नये असे मत आ. हर्षवर्धन जाधव यांनी लातूर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

     मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात सर्वप्रथम आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी मराठा युवा मत परिवर्तन समुपदेशन यात्रा काढली आहे. त्यानिमीत्ताने लातूर दौऱ्यावर आलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकारची विश्वासार्हता राहिली नसल्याने आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा तरूण नैराश्य मानसिकतेत आहेत. आरक्षण केंव्हा मिळेल, कसे मिळेल याची खात्री वाटत नसल्याने मोठ्या प्रमाणात आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. ते रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलणे गरजेचे आहे. म्हणून मानसोपचार तज्ञांना सोबत घेवून आम्ही मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात समुपदेशन यात्रा काढली आहे, असे बोलून आ. हर्षवर्धन जाधव म्हणाले. यात्रेच्या माध्यमातून निराशेच्या गर्तेत सापडलेल्या जास्तीत जास्त तरूणांपर्यंत पोहोवण्याची आमची धडपड आहे. 

       खऱ्या अर्थाने हे राज्य शासनाचे काम आहे, त्यासाठी निधीही उपलबध असतो, परंतू, दुदैवाने सरकार, राजकीय पक्ष, बघ्यांची भुमिका घेत आहेत, अशी टिकाणी करून हर्षवर्धन जाधव म्हणाले. राजकारणापलिकडे माणुसकी म्हणून सर्वांनी यासंबंधी विचार करावा अन्‌ मराठा तरूणांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. 

तातडीने अध्यदेश काढावा 
आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा त्यातून मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचा संदेश जाईल. यासंबंधी अनेकदा बोलूनही मुख्यमंत्री ऐकत नाहीत असे बोलून ते म्हणाले संविधानात ठराविक कालावधीसाठी मागास समाजासाठी आरक्षणाची तरतुद करण्यात आली. काही काळानंतर त्याचा आढावा घेणे गरजेचे असताना आरक्षणाचं माध्यम राजकारणासाठी केला गेला. आरक्षणाचा राजकीय शस्त्र म्हणून वापर झाल्याने सामाजिक विषमता वाढत गेली. खरे तर कोणालाच आरक्षण देवू नका, फ्री सोसायटी करा पण तसेच करण्याची हिम्मत कोणत्याही राजकीय पक्षात नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

मेंटल हेल्थ अवरनेस आवश्यक 
जीवनात आव्हाने, यश-अपयश, उतार-चढाव येत असतात. परंतू, त्यास सामोरे जाण्यासाठी मेंटल हेल्थ अवरनेस आवश्यक आहे. अशा वेळी कसलाही मनात न्युनगंड न ठेवता मानोसपचार तज्ञांचा सल्ला घ्या असे मत पुणे येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. इशा झा यांनी यावेळी व्यक्त केले. निराश-हताश झालेल्या व्यक्तीत नकारात्मक विचार येतात, अशावेळी त्याला समजून घ्या, आपले प्रवचन झाडू नका याशिवाय आत्महत्येचे विचार येणाऱ्या तरूणांना वेळीच समुपदेशन गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या. 

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment