...तर उद्या सरकारचे वस्त्रहरण करू

Saturday, August 4, 2018


मुख्यमंत्र्यांचा फोटो उराशी घेवून हिंगोलीत मराठा समाजाचे अर्धनग्न आंदोलन

हिंगोली / प्रतिनिधी
येथील महात्मा गांधी चौकात ३० जुलैपासून मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. प्रत्येक दिवशी नाविन्यपूर्णरित्या आंदोलन छेडले जात असताना सहाव्या दिवशी शनिवारी (दि.४) आंदोलकांनी अर्धनग्न होत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पूर्ण प्रदक्षणा घातली. मुख्यमंत्र्यांचा फोटो आंदोलकांनी उराशी उलटा धरून आरक्षणाची मागणी केली.
परळी येथे सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हिंगोली येथेही ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत अद्यापही सकारात्मक नसल्याने आंदोलकांनी आरक्षणाशिवाय माघार नाही, असा पावित्रा घेत आंदोलन सुरूच ठेवले आहे. ठिय्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शनिवारी (दि.४) दुपारी ३ च्या सुमारास आंदोलकांनी अर्धनग्न होत सरकार विरूद्ध आपल्या भाषणातून रोष व्यक्त केला. त्यानंतर मुख्यमंत्र्याचा फोटो उलटा धरून सर्व आंदोलकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला प्रदक्षीणा घातली. यावेळी एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजीही केली.
आज मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. स्वत:चेच कपडे स्वत: काढून सरकारपर्यंत आपल्या भावना पोहचवित आहे. सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ निकाली न काढल्यास उद्या मराठा समाज सरकारचेही वस्त्रहरण करेल, असा गंभीर इशाराही या आंदोलकांनी आपल्या बोलण्यातून दिला. या आगळ्या वेगळ्या आंदोनामुळे गांधी चौक दणाणून गेला होता. विशेष म्हणजे आंदोलकांसमोर ढोलताशा वाजवून हे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, दिवसेंदिवस या ठिय्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे. हिंगोली जिल्हा डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आरक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून आंदोलन ठिकाणीही पाठिंबा दर्शविला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ग्रेन मर्चट असोसिएशनच्या वतीनेही पाठिंबा देण्यात आला आहे. जिल्हा वकील संघानेही प्रत्यक्ष उपस्थिती लावत मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. तर ५ ऑगस्टला केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शविणार आहेत. तसेच भाजपा वगळता कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह आदी राजकीय पक्षानेही मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

No comments:

Post a Comment