लातूर / प्रतिनिधी
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील गढीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी देशमुख यांच्या निषेधाच्या घोषणा देवून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चा तर्फे मराठा समाजातील लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करून निषेध केला जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे. त्याअंतर्गत गुरूवारी बाभळगाव येथील देशमुख यांच्या गढीसमोर आंदालन करण्यात आले. बाभळगाव येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्या पार्श्वभुमिवर आ. अमित देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रक काढून मराठा आंदोलनाला पाठींबा दर्शविला होता.
आंदोलन होणार असल्याने कॉंग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक बाभळगाव मध्ये उपस्थित होते. सकाळी 11 वा. सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते बाभळगावच्या गढीसमोर आले. पायऱ्यावरच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सहभागी होवून पाठींबा दर्शविला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या स्मारक स्थळी जावून दर्शन घेतले.
No comments:
Post a Comment