लातूर /प्रतिनिधी :एकेकाळी काँग्रेसचा गड असणारा लातूर जिल्हा गेल्या काही वर्षात भाजपामय झाला आहे. यामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली असून परिणामी कॉंग्रेस कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. या कारणाने पक्षातील गटबाजी आता चव्हाट्यावर येऊ लागली असून लातूर शहरात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कंदील मोर्चात ती प्रकर्षाने जाणवली .
काँग्रेसने आयोजित केलेल्या कंदील मोर्चात पक्षाच्या 33 पैकी केवळ बारा नगरसेवकांनी हजेरी लावली. याचाच अर्थ तेवीस नगरसेवक पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत .पक्ष आणि नेत्यांनी दिलेला आदेश त्यांनी पाळला नाही . म्हणूनच काँग्रेसमध्येही गटबाजी असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. लातूर जिल्ह्यात अनेक वर्ष काँग्रेसचा एकछत्री अंमल होता परंतु या काळात मनमानी झाल्यामुळे जनतेने लोकसभा ,जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकेत काँग्रेसला हात दाखवला. सर्व ठिकाणी काँग्रेस पराभूत झाली .त्यामुळे कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. सत्ता हस्तगत केल्यानंतर भाजपाने पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात शहरासह जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरु ठेवला आहे .
लातूर शहरातील दिवाबत्तीचा प्रश्न सोडविण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होणार आहे. कर्मचाऱ्यांकडून होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी कर भरणा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाला आहे .तरुण व कामाची जाण असणारा आयुक्त मिळाल्यामुळे शहरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम जोरात सुरु आहे. यामुळे जनता काँग्रेसच्या ऐवजी भाजपाच सक्षम असल्याचे उघडपणे म्हणू लागली आहे .
काँग्रेसचे नेते सध्या सत्तेबाहेर असल्याने फारसे सक्रिय दिसत नाहीत. शिवाय विरोधक म्हणून काम करण्याची काँग्रेसच्या नेत्यांना सवयही नाही. परिणामी सत्ताधाऱ्यांना विरोध करणेही त्यांना जमत नाही .त्यातच पक्ष व नेत्यांची धोरणे कार्यकर्त्यांच्या विरोधात जात आहेत. स्थायी समिती सदस्य निवडीत हा प्रकार दिसून आला .काँग्रेसचे अनुभवी, जाणकार नगरसेवक स्थायी समिती बाहेर पडले .अशोक गोविंदपूरकर, विक्रांत गोजमगुंडे ,रविशंकर जाधव यासारखी मंडळी बाहेर असल्याने नवख्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली. परिणामी तेथेही सत्ताधाऱ्यांना विरोध करणे त्यांना शक्य होत नाही .या निवडीनंतर पक्षातील गटबाजी समोर आली आणि कंदील मोर्चात नगरसेवकांची गैरहजेरी दिसून आली. यामुळे गैरहजर असणारे ते नगरसेवक काही वेगळा विचार करत आहेत काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे .
या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात मिळणार असले तरी भाजपाने राबवलेले विकासाचे धोरण पाहता आपल्याला काँग्रेस पक्षात भवितव्य नसल्याचे त्या नगरसेवकांना समजले आहे .यामुळे भूकंपामुळे जगभर प्रसिद्ध असणाऱ्या लातुरात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
No comments:
Post a Comment