लातूर/ प्रतिनिधी :अर्धा पावसाळा सरला तरी पावसाची प्रतीक्षा करणार्या लातूरसह मराठवाड्यात मागील दोन-तीन दिवसात रिमझीम पाऊस पडत आहे .या पावसाने बळीराजाला धीर दिला असला तरी अजूनही हा पाऊस पुरेसा नाही .अद्यापही जमिनीची भूक भागलेली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पात पाणीसाठा झालेला नाही .त्यामुळे टिप टिप बरसणाऱ्या या पावसामुळे प्रत्यक्षात आग लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
लातूर जिल्ह्यात सरासरी 714 मिमी पाऊस पडतो .यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मृग नक्षत्रात पेरणी झाली .सुरुवात चांगली झाल्यामुळे पाऊस चांगला होईल अशी आशा वाटली. शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली .परंतु पेरणी झाल्यानंतर पावसाने हात आखडता घेतला. काही वेळा तुरळक पाऊस झाला परंतु नंतर पाऊस उघडला. यामुळे पिके करपुन जाऊ लागली. मागच्या आठवड्यात गुरुवार व शुक्रवारी असे दोन दिवस रिमझिम पाऊस झाला पुन्हा उघडला . आता रविवार पासून संपूर्ण मराठवाड्यात रिमझिम पाऊस पडू लागला आहे. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. शिवारातील पिके तरारली आहेत .परंतु झालेला पाऊस अपुरा आहे .या पावसाने सोयाबीन शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची खात्री झाली आहे. पण अजूनही शेतात पडणारे पाणी शेताबाहेर निघत नाही. त्यामुळे ओढे-नाले अजूनही कोरडेच आहेत .
नद्या वाहिल्या तरच धरणांमध्ये पाणी येणार आहे. धरणे भरल्यानंतर पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. पण पावसाळ्याचे अडीच महिने संपले तरी अनेक प्रकल्प जोत्याखाली आहेत .काही प्रकल्पात दोन - चार टक्के पाणी साठले आहे .लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातही जेमतेम पाणीसाठा आहे. जिल्ह्यात असणारे मध्यम प्रकल्प अजून पाण्याची वाट पाहत आहेत .लघु प्रकल्पांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे बरसणाऱ्या पावसापेक्षा जोरदार आणि मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. हवामान विभागाने मंगळवार आणि बुधवार मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे . हा अंदाज खरा ठरावा आणि धो- धो पाऊस बरसावा अशी प्रार्थना शेतकरी व सामान्य नागरिक करू लागले आहेत. असे झाले नाही तर हिंदी चित्रपटातील गाण्याप्रमाणे' टिप टिप बरसा पाणी, पाणी ने आग लगाई'अशी स्थिती लातूरसह संपूर्ण मराठवाड्यातून होणार आहे
No comments:
Post a Comment