महाराष्ट्राला सनातनची नको, फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हवी: मल्लिकार्जून खर्गे

Friday, August 31, 2018

काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा कोल्हापुरातून जंगी शुभारंभ
केंद्र व राज्य सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा करणार पर्दाफाश


कोल्हापूर, दि.-
भाजप-शिवसेनेचे सरकार सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांना पाठबळ देते आहे. हे धोरण निषेधार्ह असून, महाराष्ट्राला सनातनची नव्हे तर फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हवी असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटले आहे.


काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात यात्रेच्या उद्घाटनीय कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना खर्गे यांनी मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले की, भारतात अनेक पंतप्रधान होऊन गेले. पण कोणत्याही पंतप्रधानांनी जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचे उद्योग केले नाहीत. परंतु, मोदी सरकारच्या काळात देशातील वातावरण प्रचंड कलुषित केले जात आहे. आजवर कोणत्याही पंतप्रधानांनी आपला स्तर सोडला नाही. पण मोदींनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस देशामध्ये एकता कायम ठेवण्यासाठी लढाई लढते आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा केवळ निवडणूक जिंकण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी नाही. तर ही तत्वांची लढाई आहे.

हे सरकार फक्त ३-४ भांडवलदारांचे: बाळासाहेब थोरात
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे हे सरकार ना शेतकऱ्यांचे आहे, ना कामगारांचे आहे, ना व्यापाऱ्यांचे आहे. तर हे फक्त मोजक्या ३-४ भांडवलदारांचे सरकार असल्याचे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आ. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ते म्हणाले की, या सरकारने लोकांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. काँग्रेस आघाडी सरकारचे निर्णय आणि वर्तमान युती सरकारच्या निर्णयांचा तुलनात्मक उहापोह करून थोरात यांनी या देशातील जनता पुन्हा काँग्रेसलाच निवडून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

या मेळाव्याला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. नसीम खान, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. विश्वजीत कदम यांनीही संबोधित केले. तत्पूर्वी माजी राज्यमंत्री आ. सतेज पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये काँग्रेस आघाडी सरकारने युती सरकारच्या तुलनेत कसे चांगले निर्णय घेतले, याची विस्तृत माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खास यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या गीताचे यावेळी विमोचन करण्यात आले. 

दरम्यान, आज सकाळी महालक्ष्मी मंदिरात जाऊन काँग्रेसच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी आशीर्वाद घेतला. त्यानंतर आ. सतेज पाटील यांनी जनसंघर्ष ज्योत प्रज्ज्वलीत करून ती मल्लिकार्जून खर्गे व खा. अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवली. दरम्यान,जनसंघर्ष यात्रेने मराठा व लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांना भेट देऊन त्यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात झालेल्या मेळाव्याला माजी मंत्री आ. मधुकरराव चव्हाण, ज्येष्ठ नेते कलाप्पा आवाडे, जयवंतराव आवळे, खा. कुमार केतकर, आ. शरद रणपिसे, आ. बसवराज पाटील, आ. आनंदराव पाटील, आ. डी.पी. सावंत, आ. विरेंद्र जगताप, आ. हुस्नबानो खलिफे, आ. रामहरी रूपनवर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुवा, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत,अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, महापौर शोभाताई बोंद्रे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह अनेक प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment