महिला व बालविकासचे दोन अधिकारी चतुर्भूज पोषण आहाराचे बिल काढण्यासाठी मागितली होती 63 हजार 500 ची लाच

Friday, August 31, 2018


उस्मानाबाद / प्रतिनिधी 
बचत गटाच्या माध्यमातून वाशी तालुक्यासाठी तक्रारदाराच्या पत्नी पोषण आहार योजनेअंतर्गत खाद्य पुरविण्याचे काम करतात. याचे बिल काढण्यासाठी व पोषण आहाराचे घेतलेल्या नमुन्यावर कारवाई होऊ नये यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषद येथील महिला व बालविकास विभागातील दोन अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडून 63 हजार 500 रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्विकारताना एसीबीच्या पथकाने 31 ऑगस्ट रोजी रंगेहाथ पकडले. 

       याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या पत्नी या महिला बचत गटाच्या अध्यक्षा असून त्या बचत गटामार्फत वाशी तालुक्यासाठी घरपोच पोषण आहार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अंगणवाडी मार्फत खाद्य पुरविण्याचे काम करतात. सदरील योजना जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविली जाते. याप्रकरणी थकीत बिल काढणे, प्रलंबित गहू मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार करणे व पोषण आहाराचे घेतलेले नमुने यावर कारवाई होऊ नये यासाठी मदत करण्याकरिता महिला व बालविकासचे विभागाचे अधिकारी सहाय्यक प्रशासन अधिकारी गोवर्धन लांडगे व वरिष्ठ सहाय्यक अधिकारी उमेश पवार या दोघांनी तक्रारदाराकडे 63 हजार 500 रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. 

तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क केला असता एसीबीच्या वतीने तक्रारीची शहानिशा करण्यात आली आणि त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी 63 हजार 500 रूपयांची लाच घेताना सहाय्यक प्रशासन अधिकारी गोवर्धन लांडगे व वरिष्ठ सहाय्यक उमेश पवार या दोघांना महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बी.बी.गावंडे यांनी व त्यांच्या पथकांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment