नोव्हेंबर अखेर मराठा आरक्षण : मुख्यमंत्री

Sunday, August 5, 2018




मुंबई ::मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे .परंतु केवळ अध्यादेश काढून हा प्रश्न सुटणार नाही तर त्यासाठी संपूर्ण वैधानिक प्रक्रिया पार पाडावी लागेल. ही प्रक्रिया नोव्हेंबर अखेर पूर्ण होईल. एवढेच नव्हे तर आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय मेगा भरती होणार नाही ,असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले .

आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी विविध वाहिन्यांवरून संवाद साधला .राज्य  मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकरात लवकर येईल .हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याची वैधानिक कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात राज्य सरकारने कारवाई सुरू केली आहे .कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता सर्व समाजाचे हित कायदेशीर पद्धतीने जपूनच मेगा भरती केली जाणार आहे .

समाजाला न्याय देण्याची  राज्य सरकारची  भूमिका आहे. या विषयात राजकारण केले जात नाही .समाजाने संवादातून मार्ग काढावा, कायदा हातात घेऊ नये .शिवछत्रपतींचा  हा महाराष्ट्र आहे .फुले ,शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे समाजाने हिंसक आंदोलन करू नये .दगडफेक, जाळपोळ यासारखी आंदोलने करू नयेत .शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे .हिंसक आंदोलने झाली तर  राज्यात येणारी परदेशी गुंतवणूक थांबेल .देशात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे .परंतु चाकण व औरंगाबाद येथील घटनामुळे  चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे आंदोलने थांबवावीत, लवकरात लवकर आरक्षण देण्यास शासन कटिबद्ध आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले

No comments:

Post a Comment