भाजपला हरवण्यासाठी देश पिंजून काढू- शरद पवार

Monday, August 6, 2018


नवी दिल्ली: आगामी निवडणुकीपर्यंत विरोधकांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी आणि देवेगौडा यांच्यासह देश पिंजून काढण्याची माझी तयारी आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. मला पंतप्रधानपदाची अपेक्षा नाही, सोनिया गांधी व देवेगौडा यांनाही तशी आस नसावी. त्यामुळे आम्ही तिघे देश पिंजून काढू. जेणेकरुन भाजपला सक्षम पर्याय असल्याचा विश्वास लोकांना वाटेल, असे पवार यांनी म्हटले. 

एका  मुलाखतीत शरद पवार यांनी  आपली भूमिका मांडली. पवारांनी सध्याच्या परिस्थितीची तुलना १९७५-७७ च्या कालखंडाशी केली. त्या काळात इंदिरा गांधींना पर्यायच नाही, असा भ्रम होता.  मोदींच्याबाबतीत नेमकी तीच परिस्थिती आहे.

आता विरोधकांनी राष्ट्रव्यापी आघाडीऐवजी राज्यस्तरावर एकत्र येण्याकडे लक्ष केंद्रित करावे. पंतप्रधान कोण असेल, हा प्रश्न बाजूला सारावा. राज्यस्तरीय युत्या कराव्यात, असा पर्याय पवारांनी सुचवला. गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींशी झालेल्या चर्चेवरुन त्यांच्यात सुधारणा झाल्याचे वाटते, असेही पवारांनी सांगितले.

इंदिरा गांधी यांच्या काळात विरोधी पक्षांमध्ये दुही होती. मात्र, जयप्रकाश नारायण यांचा सल्ला मानून विरोधकांनी आपापसांतील मतभेद बाजूला सारले. सध्या सोनिया गांधी, देवेगौडा आणि मी, आम्हा तिघांना पंतप्रधानपदाची अपेक्षा नाही.  भाजपला पर्याय देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणायचे आहे, असे पवार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment