नवी दिल्ली :राजकीय क्षेत्रातील ध्रुवतारा, आपल्या कवितांनी जनमानसाला खिळवून ठेवणारा कवी ,बहुमत नसतानाही तीन वेळा पंतप्रधानपदी विराजमान होऊन खिचडी सरकार चालविणारा मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख असलेले अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले मुखाग्नी नमिता नी दिली .राष्ट्रीय स्मृतिस्थळ येथे त्यांच्या पार्थिवावर वैदिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले .
अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले होते .गुरुवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव शरीर कृष्णमेनन मार्गावरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणण्यात आले होते .गुरुवारी सकाळपासूनच वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती सायंकाळी रुग्णालयाच्या सुत्रांनी वाजपेयी आपल्याला सोडुन गेल्याची वार्ता सांगितली.
सायंकाळी पार्थिव शरीर निवासस्थानी आणल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यांच्यासह मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले .वाजपेयी यांचे पार्थिव शरीर शुक्रवारी सकाळी भाजपा मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते .पंतप्रधान मोदी तेथे जातीने उपस्थित होते. देशभरातून आलेले विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तेथे वाजपेयी यांच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेतले .दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा सुरू झाली .राजघाटा शेजारी असणाऱ्या राष्ट्रीय स्मृतिस्थळावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे कालच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे तेथेही पूर्वीपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. निवासस्थानापासून राष्ट्रीय स्मृती स्थळापर्यंत ६ किलोमीटर अंतरात रस्त्याच्या दुतर्फा नागरिक गर्दी करून उभे होते .सजवलेल्या वाहनात वाजपेयी यांचे पार्थिव शरीर ठेवण्यात आले होते .या वाहनाच्या मागोमाग पंतप्रधान नरेंद्र मोदी चालत होते . त्यांच्या समवेत भाजपाध्यक्ष अमित शहा व इतर नेते चालत होते .हे अंतर पार करण्यासाठी जवळपास तीन तास लागले. राष्ट्रीय स्मृतिस्थळावर त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात वैदिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर


No comments:
Post a Comment