नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. वाजपेयींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती दिल्लीतील एम्स रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्समध्ये येणार .अनेक नेत्यांनी ट्विट करून वाजपेयींना दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना केली आहे.
वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी एम्समध्ये हजेरी लावली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल बुधवारी संध्याकाळी एम्स रुग्णालयाकडे धाव घेतली. मोदींनी 40 मिनिटांहून अधिक वेळ एम्समध्ये घालवला. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीही प्रकृतीची विचारपूस केली होती. रात्री उशीरा हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनीदेखील एम्स रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
गेल्या 66 दिवसांपासून रुग्णालयात 93 वर्षीय अटल बिहारी वाजपेयी यांना 11 जून 2018 रोजी उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं. किडनीच्या आजारामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. वाजपेयी 2009 सालापासूनच आजारी आहेत . अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त आहेत.
अटल बिहारी वाजपेयींना नेमका कोणता कोणता त्रास
वाजपेयींनी किडनी संसर्ग, छातीदुखी, मूत्र संसर्ग हे त्रास आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गेल्या 66 दिवसांपासून उपचार सुरु आहेत. याशिवाय त्यांना मधुमेह अर्थात डायबिटीज आहे. शिवाय त्यांची एकच किडनी काम करते. 2009 पासून ते आजारी आहेत. 2009 मध्ये त्यांना झटका आला होता, तेव्हापासून त्यांना स्मृतीभ्रंश झाला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे केवळ देशाच्या पंतप्रधानपदी तीनवेळा विराजमान झाले नाहीत, तर एक जिंदादिल राजकारणी म्हणूनही आपलं व्यक्तिमत्त्व लोकांसमोर ठेवलं. हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्व अशा अनेक गोष्टींनी त्यांचं आयुष्य बनलं आहे.
भारत रत्न
अटल बिहारी वाजपेयी यांना मोदी सरकारने 2015 मध्ये देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारत रत्नने गौरवलं. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अटल बिहारी बाजपेयी तीन वेळा पंतप्रधान
अटल बिहारी वाजपेयी यांनी तीनवेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं. पहिल्यांदा 1996 मध्ये ते पंतप्रधान झाले. मग 1998 आणि 1999 ते 2004 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं.
कवी, लेखक,पत्रकार, राजकारणी
वाजपेयी हे केवळ राजकारणी नाहीत तर त्यांनी पत्रकार, कवी, लेखक अशा अनेक क्षेत्रात काम केलं आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते पत्रकार होते. काश्मीरमध्ये परमिट सिस्टम लागू करण्यात आलं होतं, तेव्हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींसोबत पत्रकार म्हणून वाजपेयी काश्मीरला गेले होते.श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा नजरकैदेत मृत्यू झाला. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी राजकारणात येण्याचं निश्चित केलं. दरम्यानच्या काळात त्यांनी कवी, लेखक म्हणूनही नाव कमावलं होतं.

No comments:
Post a Comment