दुष्काळापासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी एकत्र या : पालकमंत्री निलंगेकर यांचा संदेश

Wednesday, August 15, 2018

लातूर /प्रतिनिधी: दुष्काळी लातूर जिल्हा ही ओळख पुसून टाकण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत. या कामात यशही येत आहे . आपल्या पुढच्या पिढीसाठी आपला जिल्हा पाणीदार असावा यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. दुष्काळापासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने काम करण्याची गरज आहे .या कार्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया ,असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.


स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेला संदेश दिला. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतानाच लातूरला जलयुक्त करण्यासाठी सक्रिय होण्याचे आवाहन त्यांनी केले .आपल्या संदेशात पालकमंत्री म्हणाले की जिल्ह्यात 953 गावे असून यापैकी 520 गावे टंचाईमुक्त झाली आहेत .यासाठी 11000 कामे हाती घेण्यात आली असून ती आता पूर्ण होत आली आहेत. तीन टप्प्यात दुष्काळमुक्तीचे काम सुरू असून आता शेवटच्या टप्प्यात 150 गावांमध्ये ही कामे केली जाणार असल्याचे ते म्हणाले. 

लातूरला दुष्काळमुक्त करण्यासाठी वर्षभर साजरे होणारे सण आणि उत्सव यातूनही काम करता येईल. लवकरच गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे .या दहा दिवसात गणेश मंडळांनी छतावरील पाण्याचे पुनर्भरण, विंधन विहिरींचे पुनर्भरण व वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवले तर या कार्यास हातभार लागणार आहे. जिल्ह्यात असणाऱ्या प्रत्येक गावातील किमान एका गणेश मंडळाने दररोज दहा शोष खड्डे घेतले तर एकूण 90 हजार शोषखड्डे जिल्ह्यात तयार होतील. लातूर जिल्हा आज टँकरमुक्त असून भविष्यात तो कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त होईल यासाठी एकत्र येऊया, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment