मोदींचे 100 Day's प्रकल्प उद्घाटनाचा धुमधडाका

Friday, August 24, 2018

नवी दिल्ली :आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने आतापर्यंत केलेले काम आणि राबविलेल्या योजनांची माहिती देतानाच पूर्ण झालेल्या किंवा लवकरच पूर्ण होणाऱ्या योजनांची उद्घाटने करण्याचे सरकारचे नियोजन आहे. यासाठी शंभर दिवसांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून लवकरच प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका लावण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठीचा हा मास्टर प्लॅन असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे .

2014 साली केंद्रात मोदींच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार आले .जनतेला मोठमोठी आश्वासने दिल्यामुळे सत्तांतर होऊन भाजपाला संधी मिळाली .त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे आव्हान भाजपासमोर होते . मोदी सरकारने सुत्रे स्वीकारल्यानंतर अनेक योजना सुरू केल्या .त्यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांचे लोकार्पणही झाले आहे. काही प्रकल्पांचे लोकार्पण शिल्लक असून उर्वरित प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत .केंद्र सरकारसाठी ही मोठी उपलब्धी आहे .विरोधक एकत्र येत असताना मोदी सरकारने केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड तयार करून ते प्रचारात वापरण्याचे नियोजन आहे. प्रकल्प उद्घाटनाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यापूर्वी 50 सभा घेऊन मोदी देश ढवळून काढणार आहेत .

साधारण दहा लोकसभा मतदारसंघांसाठी मोदींची एक सभा होईल. विशेष म्हणजे प्रकल्प लोकार्पणाच्या निमित्ताने ही सभा होणार आहे .त्यातही मध्यप्रदेश ,राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल ,झारखंड आणि गुजरात या राज्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते .मोदी सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्या खात्याचे काम सर्वाधिक गतिमान आहे .त्यामुळे अनेक रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण लवकरच होण्याची शक्यता आहे .

आयुष्यमान योजना हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे .25 सप्टेंबर रोजी त्याचेही लोकार्पण केले जाणार आहे .वर्षअखेरीस निवडणुका होणाऱ्या तीन राज्यांपैकी एका राज्यात या योजनेचे लोकार्पण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकांना अवकाश असला तरी प्रचाराचा धुराळा आतापासूनच उडण्यास सुरुवात होणार आहे .मोदींच्या 'हंड्रेड डेज 'या योजनेमुळे गेल्या काही महिन्यात एकत्र होऊन मोदी विरोध दर्शविणाऱ्या विरोधकांना आणखी गतीने काम करावे लागणार आहे .

No comments:

Post a Comment