बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा द्या सर्व धर्मियांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

Saturday, July 7, 2018

हिंगोली / प्रतिनिधी
उत्तर आणि मध्य प्रदेशातील बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हदरून गेला आहे. अशा घटनांमुळे जागतिक स्तरावर भारताची छबी खराब होत असून, महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वाढती गुन्हेगारी, बलात्काराच्या घटना सरकारने गांभिर्याने घेवून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी सर्वधर्मीय, सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

उत्तर प्रदेशातील एका गावात सतरा वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची निघृर्ण हत्या करण्यात आली. तसेच मध्य प्रदेशातील मन्सौर येथे अल्पवयीन  मुलीवर अत्याचार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या शिवाय  जम्मू कश्मीरमध्येसह  नराधमांनी अत्याचार केला. या घटनांमुळे देशात महिला, मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, ही बाब सरकारने गांभिर्याने घेण्याची गरज असल्याचे मत मोर्चेकर्‍यांनी नोंदविले. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनांचा खटला विशेष न्यायालयात चालवून नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच राष्ट्रपती महोदयांनी अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली. शहरातील महत्मा गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा इंदिरा गांधी चौक, बस स्थानक, नांदेड नाका येथून मार्गस्थ होत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला.

तेथे मोर्चेकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांना मागणीचे निवेदन दिले. मोर्चात मुस्लीम पर्सनलॉ बोर्डाचे सदस्य मौलाना जुनेद्दुर रहेमान कासमी, जमेतूल उलेमाहिंदचे अध्यक्ष मौलाना इजाजबैती, भविमचे जिल्हाध्यक्ष शेख युसुफ मामू, मुफ्ती काजी फहीम, बसपाचे रमेश भिसे पाटील, देविदास चाटसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, न.प.गटनेते हाजी निहाल, मुफ्ती अब्दुल कदीर, मुफ्ती जियाओद्दीन, मुफ्ती शमी रहेमान, मौलाना इब्रान, हाफेज अ.बासीद मौलाना, हाफेज अनिस, मो.साजीद मो.खर्शीद, स.ईस्माईल स.इब्राहीम, शेख सत्तार तांबोली, मो.हनिफ तांबोली यांच्यासह सर्व धर्मिय समाज बांधवांनी सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment