राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी दिलीप चव्हाण

Saturday, July 7, 2018

राष्ट्रवादीच्या गोठात उत्साहाचे वातावरण
हिंगोली / प्रतिनिधी - हिंगोलीचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची नुकतीच गृहवित्त महामंडळाच्या निवडणुकीत संचालकपदी निवड झाली आहे. या निवडीनंतर त्यांची ६ जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही निवड घोषीत केली असून या निवडीने राष्ट्रवादीच्या गोठात उत्साहात वातावरण पसरले आहे. 

महाविद्यालयीन जीवनापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून दिलीप चव्हाण यांनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेश केला. कोणतेही राजकीय पाठबळ नसताना केवळ आपल्या कतृत्वाच्या आणि नेतृत्वाच्या जोरावर तरूणाईची मोट बांधत राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टीमध्ये त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्टींनी त्यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविली ही जबाबदारी त्यांनी पार पाडत जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंगे्रसची मोट बांधणी केली. त्यानंतर त्यांनी हिंगोली नगर पालिकेत नगसेवक म्हणून जागा मिळविली. आणि त्यांची राजकीय कारकिर्द बहरत गेली. त्यांच्याच नेतृत्वाखाली यापुर्वी नगर पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे यश मिळाले आणि त्यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली. तत्कालीन केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांच्या माध्यमातून हिंगोलीच्या विकासासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी त्यांनी खेचून आणला. सध्या हिंगोलीत सुरू असलेली भुमिगत गटार योजना त्यांच्याच कामाचे फलीत आहे. 

राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार त्यांनी गृहवित्त महामंडळाची निवडणुक लढविली आणि यशही मिळविले. केवळ हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही त्यांनी आपल्या राजकीय नेतृत्वाचा दबदबा निर्माण केला आहे. या निवडीनंतर गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाभरात ठिकठिकाणी त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले असताना ६ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयातून त्यांची हिंगोली जिल्हा कार्याध्याक्षपदी निवड केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. सत्कार समारंभाचे कार्यक्रम संपता न संपता चव्हाण यांची ही निवड झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात पुन्हा उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या या निवडीने जिल्ह्यात राष्ट्रवादीला अच्छे दिन येतील असे बोलल्या जाते. एकंदरीत दिलीप चव्हाण हे हिंगोलीच्या राजकारणातील किंगमेकर ठरले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून निवडीचे भिजत घोंगडे पडले होते. त्यांच्या या निवडीने या निवड प्रक्रियेला पुर्नविराम मिळाला असून जिल्हाध्यक्षपदी मुनीर पटेल यांना कायम ठेवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment