औरंगाबाद- सिडको येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलास वसंतराव नाईक चौक असे नाव देण्यात येईल असे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी 27 मे रोजी दिले होते. मात्र अद्यापही त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे महापौरांनी बंजारा समाजाच्या भावना दुखविण्याचे काम केले असून यापुढे महापौरांनी दिलेल्या शब्दाला जागावे असा टोला आ.सतीश चव्हाण यांनी महापौरांना लगावला आहे.
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत सिडको येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलास महानगरपालिकेने सावरकरांचे नाव देण्यात आले. 27 मे रोजी महापालिकेने नामकरणाचा कार्यक्रमही घेतला. त्यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी उड्डाणपुलावर वसंतराव नाईक चौक आणि वि.दा.सावरकर उड्डाणपूल अशी दोन्ही नावे ठळकपणे छापण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महिना होवूनही त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले नाही. मागच्या 25 वर्षांपासून महानगरपालिकेची सत्ता उपभोगणार्या सत्ताधार्यांनी जाती-पातीचे राजकारण करून शहरातील विविध जाती धर्मातील नागरीकांच्या भावना दुखवण्याचे काम केले आहे.
आज हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिडको उड्डाणपुलास स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले त्यास आमचा विरोध नाही. मात्र ज्या प्रमाणे स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत सिडको उड्डाणपुलास सावरकरांचे नाव दिले त्याच प्रमाणे किमान आज तरी महानगरपालिकेने सिडको उड्डाणपुलास वसंतराव नाईक चौक असे नामकरण करायला हवे होते.
आठ दिवसात सिडको उड्डाणपुलास वसंतराव नाईक चौक असे नामकरण करावे अन्यथा आम्हीच उड्डाणपुलावर वसंतराव नाईक चौक अशा नावाचा फलक लावू असा इशारा आ.सतीश चव्हाण यांनी महानगरपालिकेला दिला आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment