दूध प्रश्नासंदर्भात दिल्लीत बैठक पाशा पटेल यांची माहिती
लातूर /प्रतिनिधी :दूध दराच्या प्रश्नासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक पार पडली .याच विषयावर बुधवारीही मान्यवर मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली .
राज्यात सध्या दूध दराचा विषय ऐरणीवर आलेला असून या विषयावर तोडगा काढण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. विविध संघटनांच्या मागणीप्रमाणे दुधाचे दर वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतलेला आहे .त्यानंतरही दूध दरासाठी आंदोलन सुरूच आहे. दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली .
केंद्रीय मंत्री पियुष गोयल ,नितीन गडकरी यांच्यासह राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची या बैठकीस उपस्थिती होती. केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग घेतला. बुधवारी याच विषयावर पुन्हा बैठक होणार आहे .
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यालयात व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीस नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर ,मनेका गांधी ,राधामोहन सिंह यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शेतकऱ्यांच्या व दूध उत्पादकांच्या प्रश्नावर तोडगा निघावा हे सरकारचे उद्दिष्ट आहे .त्यामुळेच शेतकरी व दूध उत्पादकांच्या प्रश्नांची जाण असणारे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना या बैठकांसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे या प्रश्नावर लवकरच तोडगा निघु शकणार आहे .
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment