काकासाहेब शिंदेंना श्रद्धांजली, हजारो समाजबांधव रस्त्यावर
हिंगोली / प्रतिनिधी
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेचे पडसाद मंगळवारी हिंगोली जिल्ह्यात उमटले असून हिंगोली शहरासह जिल्हाभरात सकाळपासूनच कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत हजारो मराठा तरूण रस्त्यावर उतरले आहेत. हिंगोली शहरातील भाजीमंडई भागात तरूणांनी रोष व्यक्त करत बंद असतानाही सुरू केलेल्या दुकानांची नासधूस केली आहे. बसस्थानकावरही शुकशुकाट असून राज्य महामार्गही ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. मराठा समाजाच्या वतीने काकासाहेब शिंदे यांना ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.
23 जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील मराठा तरूण काकासाहेब शिंदे यांनी गोदापात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतल्याने राज्यभरात मराठा आरक्षण पेटले असून हिंगोलीतही हिच परिस्थिती पहावयास मिळत आहे. आज मंगळवारी भल्या पहाटेपासूनच हजारो मराठा तरूण रस्त्यावर उतरले आहेत. हिंगोली शहरातील मुख्य बाजारपेठ, अकोला बायपास परिसरही कडकडीत बंद ठेवण्यात आला. वसमत, औढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी आदी ठिकाणी बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच हिंगोली आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. तर दुसऱ्या आगारातूनही एकही बस हिंगोली शहरात दाखल झालेली नाही.
मराठा तरूणांनी घेतलेल्या बंदच्या भुमिकेमुळे हिंगोली शहरातील सर्वच प्रतिष्ठाणे कडकडीत बंद असल्याचे चित्र पहावयास मिळाले. येथील भाजीमंडई भागात वारंवार सुचना करूनही एका व्यापाऱ्याने किराणा दुकान बंद न केल्याने मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. संतप्त झालेल्या तरूणांनी किराणा दुकानातील माल रस्त्यावर फेकला. हिंगोलीच्या इतिहासात मंगळवारच्या बाजाराच्या दिवशी एवढा कडकडीत बंद पहिल्यांदाच पाळल्याचे बोलले जाते. सध्या तरी मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेला बंद शांततेच्या मार्गाने सुरू आहे. येथील गांधी चौकात मराठा समाजातील सर्वच संघटनांचे पदाधिकारी हजारोंच्या संख्येने ठाण मांडून आहेत. सरकारविषयी असलेला रोष आपल्या भाषणातून अनेकांनी व्यक्त केला.
पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेला निघालेले हजारो वारकरी एसटी बसमध्ये असल्यामुळे एसटीबसवर दगडफेक करू नये असे आवाहनही सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हाभरात ठिकठिकाणी हा बंद पुकारण्यात आला असल्याने हिंगोली-नांदेड, हिंगोली-वाशिम व हिंगोली-परभणी या राज्य रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. वातावरण चिघळू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment