आषाढीची महापूजा रद्द

Sunday, July 22, 2018

 वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय

 मुंबई  :आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापूजा  करण्यापासून रोखण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये ,त्यांना सुरक्षितपणे दर्शन घेता यावे आणि यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी  यासाठी  पंढरपूरला जाऊन महापूजा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी महापूजा रद्द झाली असल्याची माहिती दिली आहे .

गेल्या काही दिवसात आरक्षणासाठी मराठा समाजाने आंदोलन सुरू केले आहे .विविध मार्गांनी हे आंदोलन सुरू आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर अद्यापही तोडगा निघालेला नाही .त्यामुळे परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही अशी घोषणा मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती. अशा स्थितीत मुख्यमंत्री पंढरपूरला आले आणि समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले तर त्यातून पांडुरंगाच्या दर्शनासाठी दूरवरून आलेल्या भक्तांची गैरसोय होण्याची शक्यता आहे .आंदोलन झाले तर वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होणार आहे .या स्थितीचा विचार करून महापूजेला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा होणार नाही.

 यापूर्वीही मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी तसेच उपमुख्यमंत्री आर .आर. पाटील ,अजित पवार यांना आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अनुक्रमे आषाढी व कार्तिकी एकादशीनिमित्त होणारी महापूजा रद्द करावी लागली होतीमुख्यमंत्री जाणार नसल्याने उद्या पांडुरंगाची पुजा कोणाच्या हस्ते होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment