लातूर/प्रतिनिधी :
देशाच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत असे प्रतिपादन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
निलंगा येथे विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी व पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मार्गदर्शन करताना पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि.प.अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, अरविंद पाटील निलंगेकर, निलंगा तालुकाध्यक्ष तथा जि.प. समाजकल्याण सभापती संजय दोरवे, माजी आ. टी.पी. कांबळे, देवणी तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, शि. अनंतपाळ तालुकाध्यक्ष कोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, सत्तेत असताना कॉंग्रेसच्या सरकारने मागील साठ वर्षात साठ हजार कोटी रूपयांचे धान्य खरेदी केले. याउलट मोदी सरकारने एकाच वर्षात चार हजार कोटी रूपयांचे धान्य खरेदी करून शेतकर्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देतानाच अंतर्गत सुरक्षाही मजबूत केली. यामुळेच मागील चार वर्षात देशात एकही बॉंबस्फोट झाला नाही. यामुळे राज्यातील जनता सुखासमाधानाने राहू शकली. कॉंग्रेसने सौदागर बनून देशाच्या विकासासाठी कसलेली काम केले नाही. मोदींच्या नेतृत्वातील राज्य सरकारने घेतलेल्या धोरणामुळे आता पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही ते म्हणाले.
राज्यसरकारने शेतकर्यांसाठी कर्जमाफी केल्याचे सांगून पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, केवळ मराठवाड्याला कर्जमाफीपोटी वीस हजार कोटी रूपये मिळाले आहेत. निलंगा विधानसभा मतदार संघातील शेतकर्यांना कर्जमाफीसह विविध प्रकारच्या अनुदानातून ४०० कोटी रूपयांची रक्कम सरकारकडून मिळाली आहे. याबरोबरच जास्तीत जास्त पीकविमा देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून ती रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. कॉंग्रेसच्या काळात रस्ते तयार झाल्यानंतर काही दिवसातच त्यावर खड्डे पडत होते. परंतू भ्रष्टाचाराचा थारा न देण्याच्या धोरणामुळे गुणवत्तापूर्ण कामे होत असून या सरकारने बनवलेल्या रस्त्यावर २५ वर्षे खड्डा पडणार नाही. विरोधक मात्र विरोधासाठी विरोध करत असून आलेल्या संकटांना सामोरे जात लोकहीत साधण्यासाठी पक्षहीत जोपासण्याला प्राधान्य देत असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी काळात जिल्ह्यासह मतदारसंघासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन विकासाचे नवीन मॉडेल तयार करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री निलंगेकर यांनी दिली.
यावेळी जि.प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, संजय दोरवे, गोविंद चिलकुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. या बैठकीचे प्रास्ताविक अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले. या बैठकीस निलंगा विधानसभा मतदारसंघातील देवणी, शिरूरअनंतपाळ व निलंगा तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment