-कंधार तालुक्यातील बारुळ परिसरात 15 गावांत ढग फुटी!

Sunday, June 24, 2018

नुकासनग्रस्त भागाची आ.चिखलीकरांकडून पाहणी




नांदेड-कंधार तालुक्यातील बारुळ परिसरातील 15 गावांत शुक्रवारी रात्री ढग फुटी झाली. अवघ्या एका तासात 140 मि.मी.पाऊस पडल्यामुळे परिसरातील 400 हेक्टर जमीन खरडून गेली. अनेक घरांची पडझड झाली. गावातील रस्त्यांच्यावर चार फुट पाणी साचल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे संसार उपयोगी वस्तुची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. ढग फुटीच्या पाण्यात शिवारातील जमीनी खरडून गेल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माती बांध पाण्याने वाहून गेल्यामुळे जमीनीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बारुळ व परिसरातील 150 कुटूंबियांचे संसार उघड्यावर पडले असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या नुकसानग्रस्त भागाची करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी पाऊसाने दमदार हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील 20 टक्के पेरण्या केल्या आहेत. शंभर टक्के कापसाची लागवड केली आहे. गेल्या दहा-बारा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. शुक्रवार दि. 22 जूनच्या मध्यरात्री पावसाचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले. 

कंधार तालुक्यातील बारुळ, औराळ, चिखली, हाळदा, नंदनवन, मंगलसांगवी, काटकळंबा, सावळेश्‍वर, दहिकळंबा, गुडाबिंडा, दाताळा, उस्माननगर, धनज,नंदनवन आदि गावांत मध्यरात्री तुफान पाऊस झाला. रात्री 10.45 वाजता तुफान पावसाला सुरुवात झाली. हा ढग फुटीचा तुफान पाऊस तब्बल एक तास पडल्यामुळे गावातील रस्त्यावर चार फुट पाणी साचले होते. बारुळ, नंदनवन या गावातील 150 जणांच्या घरात पाणी घुसल्यामुळे संसारउपयोगी वस्तु व धान्य पाण्याच्या पावासात वाहून गेले आहे. बारुळ येथील महादेवाच्या मंदिरात पाणी शिरले होते. मंदिर परिसर व गावातील रस्त्यावर चार फुट पाणी साचल्यामुळे घरासमोर उभ्या केलेल्या दोन मोटारसायकली वाहून गेल्या आहेत.






बारुळ परिसरातील 15 गावात ढग फूटीचा तुफान पाऊस पडल्यामुळे या गावातील शेतकर्‍यांची जवळपास 400 हेक्टर जमीन खरडून गेल्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. बारुळच्या डॅममध्ये एका रात्रीत 3 फुट पाणी जमा झाले असल्याचे सांगण्यात आले. तुफान पाऊस पडल्यामुळे नाल्याच्या बाजूला असलेल्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून विहिरीही मातीच्या गाळाने बुजल्याचे अधिकारी व आमदाराच्या पाहणीत आढळून आले आहे. हाळदा परिसरातील शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. धनज येथील पुलावरुन पाणी गेल्यामुळे पुलालगतचा रस्ताच पाण्यात वाहून गेला. त्यामुळे गावकर्‍यांचा संपर्क तुटला होता.

ढग फुटीच्या या पावसाने कापूस, हाळद, ऊस पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती मोठ्या प्रमाणात खरडून गेल्यामुळे शेतात मोठ-मोठाला गारी पडल्याचे दिसून आले. ढग फूची पावसाच्या पाण्यात खरडून गेलेली जमीन दुरुस्त करण्यासाठी शेतकर्‍यांना फार मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. पाण्याची तीव्रता एवढी होती की, रस्ते, माती बांधही वाहून गेले आहेत. बारुळ परिसरातील नाल्यावरुन पाणी वाहून गेल्यामुळे विद्युत पोलही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असल्याचे विदारक दृष्य पाहणी पथकाच्या निदर्शनास आले आहे.

बारुळ-कौठा, बारुळ-काटकळंबा पुल खरडून गेल्यामुळे कांही काळ वाहतुक ठप्प झाली होती. बारुळ परिसरातील 15 गावांवर ढग फूटीचा पाऊस झाला असला तरी कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र अनेक घरांची पडझड झाली आहे. बारुळ परिसरातील ढग फुटी ग्रस्त गावांना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, उपविभागीय अधिकारी प्रभूद्य मुळे, तहसिलदार सौ. आरुणा संगेवार, कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी भेटी देवून नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.

रविवारपासून नुकसानीचे पंचनामे सुरु करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मुळे यांनी तहसिलदार, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकार्‍यांना दिले असून येत्या आठ दिवसात पंचनामे पूर्ण करुन जिल्हाधिकार्‍यांना नुकसानीचा अहवाल पाठविला जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मुळे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. प्रत्यक्ष पंचनामे केल्यानंतरच नुकसानीचा आकडा सांगता येईल परंतु प्राथमिक अंदाजानुसार ढग फुटीमुळे बारुळ परिसरातील 15 गावातील 300 ते 400 जमीन बाधीत झाली. पाणी घरात घुसल्यामुळे 150 कुटूंब बाधीत झाले असून त्यांना तातडीची मदत देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.






पंचनामे करुन तात्काळ मदत द्यावी-आ.चिखलीकर

कंधार तालुक्यातील बारुळ परिसरातील 15 गावांवर ढग फुटीचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या जमीनी मोठ्या प्रमाणात खरडून गेल्या आहेत. कापूस, हाळद, ऊसाच्या पिकाची केलेली लागवड पाण्याने नष्ट झाल्यामुळे या परिसरातील शेतकऱी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. महसूल अधिकार्‍यांना सोबत घेवून नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली असून प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करुन शासनाला पाठवावेत अशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी विनंती केली असल्याचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment