बरसो रे मेघा मेघा ...... लातूर जिल्ह्यावर आभाळमाया

Sunday, June 24, 2018

लातूर / प्रतिनिधी :मृग नक्षत्राच्या सुरवातीला आणि आता नक्षत्र संपत असतानाही वरूणराजाने लातूर जिल्ह्यावर कृपा केल्याचे चित्र आहे . निसर्गाने लातूरवर आभाळमाया केली असून मागील दोन दिवसात सुरू असणाऱ्या पावसामुळे पेरण्यांनी वेग घेतला आहे. जिल्ह्यातील ओढे व नाले खळाळून वाहत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे .यामुळेच "बरसो रे मेघा मेघा " असे चित्र निर्माण झाले आहे .

दुष्काळी जिल्हा म्हणून लातूर ची ओळख निर्माण झाली आहे . गेल्या काही वर्षात लातूर जिल्ह्यात मृग नक्षत्रात पाऊस पडतच नाही आर्द्रा किंवा पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसावर पेरण्या होतात .मृग नक्षत्रात पेरणी झाली असता उत्पादन चांगले येते परंतु या नक्षत्रात पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनातही घट होत होती .परंतु दुष्काळाचे चटके दिल्यानंतर निसर्गानेही आता मनावर घेतल्याचे दिसून येत आहे . यावर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच लातूर जिल्ह्यात पाऊस होत आहे . पहिले चार -पाच दिवस जोरदार पाऊस झाला .नंतर पावसात खंड असल्याचे हवामान विभागानेही जाहीर केले होते .त्यामुळे पेरणी करावी की नाही अशा द्विधा अवस्थेत शेतकरी सापडला होता .तरीही काही शेतकऱ्यांनी पुढील भरवशावर तिफणीवर मुठ धरली .पेरण्या सुरू केल्या . परंतु पावसाने उघाड दिल्याने अनेकांनी पेरणी थांबवली 

.त्यामुळे यावर्षीही दुबार पेरणी करावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती .परंतु मागील दोन-तीन दिवसात पुन्हा पाऊस सुरू झाला . त्यामुळे प्रारंभीच्या काळात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला .त्यातच ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नव्हती त्यांनाही या पावसाने धीर दिला. यामुळे जिल्ह्यातील दहाही तालुक्यात पेरण्यात वेगाने सुरू झाल्या मृग नक्षत्रात पाऊस झाल्याने उडीद व मुगाचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .गेल्या काही वर्षात बहुतांश शेतकरी नगदी पीक असणारे सोयाबीन पेरण्याला प्राधान्य देत आहेत . यामुळे उडीद व मुग हद्दपार झाला होता .परंतु मृगाच्या पावसाने काही भागात ही पिके घेतली जाणार आहेत .

पावसाळ्याच्या प्रारंभीच पडलेल्या पावसाने पाण्याचा प्रश्नही मिटला आहे .नुकत्याच सरलेल्या उन्हाळ्यात पाणी टंचाई फारशी जाणवली नाही. टॅंकर किंवा विंधन विहिरीवर रांगा असे चित्र फारसे दिसले नाही .तरीही काही ठिकाणी पाणी टंचाई होती . या पावसाने ती दूर झाली आहे . मागील दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे ओढे-नाले वाहू लागले आहेत .यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे . विहिरी व विंधन विहिरींची पाणी पातळी वाढण्यास या पावसाने मदत होणार आहे . प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्यास मात्र आणखी मोठ्या पावसाची गरज आहे . सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे . पावसामुळे शिवार हिरवेगार झाले असून जनावरांना काही दिवसातच हिरवा चारा उपलब्ध होणार आहे .

एकंदर पावसाच्या जोरदार सलामीने बळीराजा आनंदी आहे .लातूर जिल्ह्यावर आभाळमाया असल्यामुळे दर वर्षाप्रमाणे 'काले मेघा काले मेघा पाणी तो बरसाओ 'असे म्हणण्याची वेळ यावेळी येणार नाही .या उलट बरसो रे मेघा मेघा असे लातूरचा शेतकरी आणि सामान्य नागरिक म्हणून लागला आहे .

काही भागात अतिवृष्टी
शुक्रवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी झाली चाकुर तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस नोंदला गेला .विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले .सुदैवाने या पावसात कसलीही दुर्घटना झाली नाही .
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment