धनाची शुद्धी दान करण्यात आहे-हभप ढोक महाराज

Tuesday, January 29, 2019
हिंगोली / प्रतिनिधी
अन्यायाने मिळविलेले धन जास्त काळ टिक नाही, अशा धनातून मिळणारी समाधानी क्षणिक असते. आज तुम्ही श्रीमंत झाला तरी उद्या भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सत्कर्माने धन कमवा व त्याच्या शुद्धीसाठी सढळ हाताने दान करा, असे मत हभप रामायणाचार्य रामराव महाराज ढोक नागपूरकर यांनी 28 जानेवारी रोजी नर्सी नामदेव येथे कलशारोहणानिमित्त आयोजित संगीतमय रामकथेत बोलताना व्यक्त केले.

संत नामदेव यांचे जन्मगाव असलेल्या नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणानिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात 25 जानेवारीपासून सकाळी 10 ते 1 या वेळेत रामायणाचार्य ढोक महाराज यांचे संगीत रामायण सुरू आहे. पुढे बोलताना महाराज म्हणाले की, रामचरित्र हे जीवनाचे कल्याण करण्यासाठी आहे. ते मनोरंजनासाठी नाही. महाराजांनी शुभसंकेताचे पाच लक्षणही यावेळी सांगितले. आज दिवसेंदिवस संस्कृती बदलत आहे. लग्नासारख्या शुभप्रसंगीही आपण वेळ काढून लग्नाचा मुहूर्त चुकवत आहोत. गोरज मुहूर्तावर असलेले प्रभू रामचंद्राचे लग्न केवळ 14 मिनीट उशिरा लागल्याने प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास भोगावा लागला होता. आज नाचगाण्याच्या नादात दुपारचे लग्न सायंकाळी लागतात हे चुकीचे आहे. त्यामुळे मुहूर्त सांभाळला पाहिजे.

सासू-सुनेच्या नात्याविषयी त्यांनी रामायणातील एकोप्याचे उदाहरण देत सांगितले की, सासू-सुनेच नातं हे मायलेकीच्या नात्यासारखे असले पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. एकमेकींना जीव लावला तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. त्यामुळे मुलांना संस्कृतीचे शिक्षण द्या, संस्कार टिकवून ठेवा. आयोध्या कांडाला सुरूवात करताना त्यांनी रामाच्या वनवासाबाबतची कथा त्यांनी उपस्थितांना सांगितली. यामध्ये राम-सिता यांचा वनवासाला जाण्यापुर्वीचा संवाद महाराजांनी उपस्थितांच्या डोळ्यासमोर उभा केला. आजच्या राजकारणाशी संबंध जोडताना त्यांनी सांगितले की, प्रभू रामचंद्र राजा होणार आहे म्हणून आयोध्या नाचत होती. पण काकू कैकई व मावशी मंथरा यांच्यामुळे रामाला राजा होता आले नाही. आजही राजकारणात अनेक किस्से असे घडत असतात. अखेरपर्यंत अध्यक्षपदासाठी एका व्यक्तीचे नाव असते पण वेळेवर दुसरी व्यक्ती होती आणि नंतर ताणतणाव निर्माण होतो. या सर्व गोष्टी भगवंताला चुकल्या नाही. आपण सर्व सामान्य माणसं आहोत. प्रभू रामचंद्र आयोध्येला निघाल्यानंतर राम, लक्ष्मण, सिता यांचा नावाड्या सोबतचा प्रसंग महाराजांनी उभा करत सकाम आणि निष्काम भक्तीचे दोन प्रकार हभप ढोक महाराज यांनी सांगितले. या संगीत रामायण कथेला लोकेश चैतन्य महाराज, काशीराम महाराज इडोळीकर, मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे, दिलीप बांगर, दाजीबा पाटील, नारायण खेडकर, डॉ. रमेश शिंदे, डॉ. सतीश शिंदे यांच्यासह हजारो महिला, पुरूष भाविकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment