लाख-हिंगोली रस्त्याची दुरावस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष

Tuesday, January 29, 2019

हिंगोली / प्रतिनिधी
हिंगोली ते लाख रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सात किलोमीटर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून गिट्टी उखडल्याने वाहनधारकांना वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर गिट्टीत गिट्टी असल्याने पायी चालणेही मुश्किल बनले आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथून हिंगोलीकडे जाण्यासाठी देवाळामार्गे 15 वर्षापुर्वी डांबरीकरणाचा रस्ता करण्यात आला आहे. या रस्त्याचे अंतर जवळपास 7 किमी आहे. परंतु रस्त्याच्या दुरूस्तीकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून संपूर्ण रस्ता उखडला आहे. मध्यंतरी दोन वेळेस या रस्त्याची थातूरमातूर डागडूजी करण्यात आली होती. परंतु त्या नंतर या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने मागील वर्षभरापासून रस्त्याची पार वाट लागली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहने चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यावर गिट्टी उघडी पडल्याने या भागातील शेतकऱ्यांना पायी चालणेही मुश्किल बनले आहे. अनेकदा प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरूस्तीसाठी मागणी करण्यात आली. परंतु ग्रामस्थांच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्या जात आहे. लाख मार्गे हिंगोलीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. पिंपळदरी, काकडदाभा, फुलदाभा, पांगरा, गढाळा, नवखा, मेथा, म्हाळजगाव या भागातील प्रवासी या रस्त्याने हिंगोलीकडे येतात. परंतु रस्त्याची दुरावस्था झाल्याने जीव मुठीत घेवून प्रवास करण्याची वेळ या भागातील प्रवाशांवर आली आहे. अनेेकदा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे रस्त्याच्या दुरूस्तीसाठी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment