अवघाची संसार सुखाचा करीन'कोषागार संचालकाचा अभ्यास चव्हाट्यावर

Sunday, January 13, 2019

हिंगोली / प्रतिनिधी
व्यासपीठावर दोन मंत्री आमदार अधिकारी बसलेले असतांना आपल्या भाषणाची वेगळी छाप पडावी यासाठी कोषागार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक भाषणात बोलतांना 'अवघाची संसार सुखाचा करीन! आनंदे भरीन तिन्ही लोक!!' हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग संत नामदेव महाराजाचा असल्याचे सांगत कोषागार विभागाचे संचालक ज.र.मेनन यांनी आपला आध्यात्मिक अभ्यास सर्वासमक्ष चव्हाट्यावर आणला आहे. 

ना.सुधीर मुंनगटीवार, पालकमंत्री दिलीप कांबळे, आ.तान्हाजी मुटकूळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीत १३ जानेवारी रोजी दुपारी कोषागार कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोषागार विभागाचे संचालक ज.र.मेनन यांच्याकडे होते. ते म्हणाले की, 'नाचू किर्तनाच्या रंगी ज्ञान दिप लावू जगी किंवा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक असा ज्ञानदानाचा आणि सुखी जीवनाचा संदेश देणारे हिंगोली जिल्ह्याचे भुमिपूत्र संत नामदेव महाराज ' खर तर संत नामदेव महाराजांनी ज्ञानदानाचा संदेश दिला हे जग जाहिर आहे. पण अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग राज्य संचालक मेनन यांनी संत नामदेव महाराजांच्या नावाने आपल्या भाषणात घुसविला. 

आपल्या भाषणाची वेगळी सुरूवात आणि उपस्थितांवर छाप पाडावी हा उद्देश मेनन यांचा असला तरी ह.भ.प.होण्याच्या नांदात संत साहित्य व आध्यात्मावर असलेला मेनन यांचा अभ्यास चव्हाट्यावर आला आहे. त्यांना संत साहित्याच्या अभ्यासाची गरज आहे अशी चर्चा उपस्थितात होत होती.

No comments:

Post a Comment