स्कूल बॅगमधून दारूची विक्री; बाटल्या जप्त

Wednesday, January 16, 2019

परभणी : गावच्या यात्रेत बेकायदेशीर पद्धतीने दारूची विक्री करण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगचा वापर होत असल्याचा अजब प्रकार पालम तालुक्यातील चाटोरी येथे उघडकीस आला.पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेने अशा स्कूल बॅगमधून दारूच्या बाटल्या जप्त केल्या. 
जिल्हा पोलिस दलाने विशेषतः स्थानिक गुन्हा शाखेने गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीवर जोरदार छापा सत्र सुरू केले आहे. यामध्ये चोरट्या पद्धतीने विविध मार्गाचा होत असलेला वापर लक्षात घेऊन पोलिसांनी प्रत्येक बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक प्रवीण मोरे यांना चाटोरी येथे अवैध पद्धतीने दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक एस.एम.देवकते, सुरेश डोंगरे, संजय शेळके, किशोर चव्हाण, सय्यद मोबीन, रामकिशन काळे, सय्यद मोईन आदींच्या पथकाने सोमवारी(दि.१४) सायंकाळी सहाच्या सुमारास चाटोरी येथे छापा मारला. त्यावेळी गावच्या यात्रेत विक्रीसाठी आणलेली दारू तेथील जय महाराष्ट्र ढाब्याच्या पाठीमागे मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगमध्ये आढळून आली. गजानन माणिकराव किरडे(वय २२) याने स्कूल बॅगमध्ये देशी-विदेशी दारूच्या ३० बाटल्या ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून हा ६ हजार ५०० रुपयांची दारू जप्त करून गजानन किरडे याच्या विरुद्ध पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment