राेजच्या जीवनात नियम पाळणे हेही देशभक्तीच - विनोद तावडे

Saturday, January 19, 2019



प्रतिनिधी | लातूर
 देशभक्ती करायची असेल तर सीमेवरच जावे असे काही नाही. 
प्रत्येकाला सैन्यदलात जाण्याची संधी मिळतेच असे सांगता येणार नाही . रोजच्या जीवनात साध्या नियमांचे पालन करणे हेही देशभक्तीचाच प्रकार आहे.  या उंच राष्ट्रध्वजाकडे पाहून नागरिकांना सैन्याचे व त्यांच्या कुटुंबीयांचे स्मरण होऊन त्यांच्या प्रती उत्तरदायित्वाची भावना जागृत राहील, असे प्रतिपादन  राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
लातूर येथील क्रीडा संकुलावरील १५० फुटांच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे तावडेंच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ. सुधाकर भालेराव, विनायक पाटील, विक्रम काळे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर सुरेश पवार उपस्थित होते. तावडे पुढे म्हणाले, लातूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुले निर्माण होतील. त्यासाठी आवश्यक निधी दुप्पट केला असून जिल्हा क्रीडा संकुल व विभागीय क्रीडा संकुलांनाही निधीची रक्कम दुप्पट केला. विद्यार्थी क्रीडा प्रकारात भाग घेतल्यास अंतिम परीक्षेस १० गुण राज्य- राष्ट्र स्तरावरील स्पर्धेत भाग घेतल्यास शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग व पदक जिंकल्यास थेट शासकीय नोकरीत प्रवेश असे उपक्रम राबवले जात आहेत.

No comments:

Post a Comment