गुरुद्वारा बोर्ड कायद्याचे कलम 11 रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन!

Friday, January 25, 2019
आ. चिखलीकर, आ. रातोळीकर, आ. तारासिंघ, डॉ. संतुक हंबर्डे यांचे शिष्टमंडळ भेटले.


नांदेड (प्रतिनिधी) ;- गुरुद्वारा बोर्ड कायद्याचे कलम 11 रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या शिष्टमंडळाला दिले. सदरचे कलम रद्द केल्याशिवाय सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे गठण केले जाणार नाही, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिली. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. स. तारासिंघ तसेच महानगर भाजपचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली शीख समाजाच्या शिष्टमंडळाने 22 तारखेला मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी कलम 11 रद्द करण्याविषयी शिष्टमंडळाला आश्वस्त केले.

या शिष्टमंडळात बोर्डाचे सदस्य गुरुमितसिंघ महाजन, गुरुप्रितसिंघ सोखी, माजी सदस्य राजेंद्रसिंघ पुजारी आदींचा समावेश होता. गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 चे कलम 11 रद्द करण्यात यावे, अशी शीख समाजाची मागणी असून, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. नांदेड येथेही याबाबत समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शीख समाजाच्या भावना लक्षात घेऊन भाजपच्या आमदारांनी पुढाकार घेतला व शीख समाजाच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून दिली.

दरम्यान, गुरुद्वारा बोर्डाच्या स्थापनेच्या वेळी बोर्डावर शासन नियुक्त दोन सदस्यांच्या नियुक्त्या करताना भाजपच्या कार्यकर्त्यांमधूनच या नियुक्त्या केल्या जातील, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती महानगर अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी कलम 11 रद्द करण्याचे आश्वासन दिल्यामुळे शीख समाजातून समाधान व्यक्त केले जात आहे.

No comments:

Post a Comment