मराठा समाजाला एसइबीसी अंतर्गत वेळेत व विनाव्यत्यय जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी शहर व तालुकास्तरावर स्वतंत्र कक्ष सुरू करावेत,अशी मागणी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी करण्यात आली.
यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना मागण्याचे निवेदन सादर केले. जिल्ह्यात मराठा समाजाची संख्या मोठी असल्याने जात प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी होणार आहे. या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यावर इतरही कामाचा भार टाकला तर प्रमाणपत्रासाठी करावे लागणारे प्रशासकीय सोपस्कार व वितरण प्रक्रियेस विलंब होऊ शकतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक तहसील स्तरावर अर्ज स्वीकृती व प्रमाणपत्र वितरणासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावेत. या कामाची जबाबदारी निश्चित केलेल्या कर्मचाऱ्यावर दुसऱ्या कामाचा बोजा टाकू नये. अर्ज स्वीकृती पासून प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी लागणारा कार्यकाळही निश्चित करावा. गाव पातळीवर तसेच शाळा महाविद्यालयात अर्ज स्वीकृती साठी कॅम्प आयोजित करावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली. ही सोय करण्यात आली तर वेळेत प्रमाणपत्र मिळणे शक्य होईल. शासनाच्या प्रस्तावित मेगा नोकर भरती पासून मराठा समाजातील युवक - युवती वंचित राहणार नाहीत . शासनाने दिलेल्या आरक्षणाचा त्यांना लाभ घेता येईल.त्यामुळे स्वतंत्र विभाग उभारून वेळेत प्रमाणपत्र वितरित करावेत अशी विनंती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून नियमाप्रमाणे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले. या कामासाठी मराठा क्रांती मोर्चाचे स्वयंसेवक प्रशासनाला सहकार्य करतील असे शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी वतीने सांगण्यात आले.
दरम्यान असेच निवेदन लातूरच्या तहसीलदारांना मराठा क्रांतीच्या वतीने देण्यात आले. दोन्ही निवेदन सादर करताना मोठ्या संख्येत समाजबांधवांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment