लातूर :जिल्हाधिकारी अर्थात कलेक्टर म्हणजे बडे प्रस्थ. अधिकाऱ्यांचा लवाजमा हाताशी असणारा हा गृहस्थ मनाला वाटेल तो निर्णय घेऊ शकतो. तो राबवण्याचा अधिकार त्यांना असतो .एका अर्थाने कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा राजाच. पण या पदावर असणारा माणूस आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना खुश करत असेल म्हणजे त्यांना काय हवे नको ते देत असेल, त्यातही त्याच्या बरोबरीचा एखादा अधिकारी असे काम करत नसेल तर त्याला पटवण्याची युक्ती सांगत असेल तर अशा व्यक्तीबद्दल काय बोलावे ?
अशी लोकं फार थोडी असतात. पण ती आपल्या कामाचा ठसा उमटवून जातात .लातूरचे जिल्हाधिकारी जी .श्रीकांत हे त्यापैकीच एक. दबंग कलेक्टर म्हणून त्यांची आजवरची कारकीर्द नोंदली गेली. पण असे असले तरी आपल्या कर्मचाऱ्यांना हा माणूस किती जपतो, त्यांना कसे सांभाळतो हे देखील वारंवार पाहण्यात येते. कामातली हयगय त्यांना चालत नाही .निष्काळजीपणा खपत नाही .
पण असे असले तरी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासही ते तेवढेच तत्पर असतात .कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी त्यांचा आग्रह असतो. यामुळेच कर्मचारी त्यांचे काम पटापट करतात. लातुरात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या 12 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या नव्या रूपाचा परिचय कर्मचाऱ्यांना झाला .
महसूल कर्मचारी सामान्य नागरिक असतात .ते श्रीमंतआणि गरीबही नसतात. त्यांना आम्ही घरकुले देत आहोत .इतर जिल्ह्यातही कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे घरकुलांची मागणी करावी आणि जर जिल्हाधिकारी ऐकत नसतील तर त्यांचा खास माणूस शोधून त्यांना पटवून घ्या आणि आपली कामे करून घ्या ,असा सल्ला त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला. हा सल्ला ऐकून राज्यभरातून आलेले कर्मचारी अवाक् झाले. अनेक अधिकाऱ्यांना अशा कामात रस नसतो .
त्यामुळेच पाहू ,बघू ,करून घेऊ असे ते सांगत असतात .अशावेळी त्यांना पटवले तर काम लवकर होते असेही श्रीकांत म्हणाले. महसूलमध्ये कामाचा ताण असतो. हा ताण हलका करण्यासाठी सुट्टी आवश्यक आहे .पण नुसत्या सुट्ट्या घेऊ नका तर कुटुंबासोबत फिरायला जा .आल्यानंतर त्याची बिले दाखल करा .पण खोटी बिले देऊ नका .फिरायला गेलेले कुटुंबासोबतचे फोटो दाखवा तरच बिल मिळेल असेही ते म्हणाले .आपण जनतेच्या समस्या सोडवतो ,सरकारचा चेहरा म्हणून काम करतो .पण तुमच्याही समस्या सुटल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment