राम मंदिर चुनावी जुमला असेल तर शिवसेना हे कधीही खपवून घेणार नाही : उद्धव ठाकरे

Tuesday, December 25, 2018


सोलापूर: राम मंदिराच्या मुद्दयावरून भाजप जर देशवासियांची फसवणूक करत असेल, तर ते शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. शिवसेनेने अयोध्येत सरयू नदीकाठी घेतलेल्या महामेळाव्याच्याच धर्तीवर आज पंढरपुरात चंद्रभागा नदीकाठी शिवसेनेने महामेळावा घेतला आणि झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी शिवसेनेचा हा मेळावा असल्याचे उद्धव ठाकरे सांगितले.

राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळत असताना सगळे पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. जागावाटप करण्यापेक्षा आगोदर शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवावेत, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली. राम मंदिर, कांदा प्रश्‍न, पिक विमा यासारख्या अनेक मुद्दयांवरून त्यांनी भाजपवर टीका केली. प्रादेशिक पक्ष मजबूत असल्यास राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली जाते, असे सूचक विधानही त्यांनी केले.

अयोध्येत झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी आम्ही गेलो होतो, आज चंद्रभागातीरी देखील कुंभकर्णाला गाड झोपेतून जागविण्यासाठी शिवसैनिक एकत्र आले असून राम मंदिर उभारल्याशिवाय कुंभकर्णाला झोपू देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

राम मंदिर आम्हीच बांधणार अशी वल्गना ही सरकार करते मात्र प्रत्यक्षात काम करत नाही. ‘अच्छे दिन येणार, 15 लाख देणार असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण केले नाही. आश्वासन पूर्ण केले नाही. काही हरकत नाही. तुम्हाला माफ करू, परंतू हिंदूंच्या धार्मिक भावनेशी खेळ केल्यास भाजपला ठोकून काढू अशा शब्दात ठाकरे यांना भाजपला इशारा दिला आहे.

सर्व आश्वासने “चुनावी जुमले’ होते असे सांगतात मात्र राम मंदिराचा मुद्दा जर “चुनावी जुमला’ असेल तर शिवसेना हे कधीही खपवून घेणार नाही. किमान महाराष्ट्रात तरी शिवसेना भाजपला हिंदूंच्या धार्मिक भावनेशी खेळ करू देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

No comments:

Post a Comment