उदगीर: मराठवाडा साहित्य परिषद आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने उदगीर येथे आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनास साहित्यिक आणि रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित परिसंवाद, कथाकथन आणि कवि संमेलनास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. दुष्काळ या विषयावरील परिसंवादात राजकीय प्रतिनिधी व माध्यम प्रतिनिधींनी आपली मते मांडली.
कवी संमेलनात निमंत्रित व नवोदित कवींनी आपल्या भावना प्रकट केल्या. कथाकथनातून ग्रामीण कथाकारांनी उपस्थित श्रोत्यांना भारावून टाकले. संमेलनस्थळी उभारण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या सभागृहात हे कार्यक्रम संपन्न होत आहेत.
साहित्य संमेलनात पहिल्यांदाच “आजच्या दुष्काळाची दाहकता आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. गणेश हाके यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या परिसंवादात माजी आमदार गोविंद केंद्रे, बसवराज पाटील-नागराळकर यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रदीप नणंदकर म्हणाले? आता दुष्काळ रोजचाच झाला आहे. जागतिक पातळीवर दुष्काळ लक्षात घेऊन विविध बाबींचे मार्केटिंग केले जात आहे. आपल्याकडे दुष्काळ वारंवार पडत असला तरी सिंचन योजनांबाबत अजूनही संभ्रम आहे.
अध्यक्षीय समारोप करताना गणेश हाके यांनी दुष्काळ हा मूलभूत विषय असल्याचे सांगितले. यावर उपाय शोधणे शक्य आहे. योग्य नियोजन केले तर आपण यापासून मुक्तता मिळवू शकतो. शिवाजी महाराज आणि नंतरच्या काळात ब्रिटिशांनी दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना केल्या. परंतु स्वातंत्र्यानंतर त्या झाल्या नाहीत, असे ते म्हणाले. या परिसंवादाचे सुत्रसंचलन श्रीमंत सिमंतकर यांनी केले. या संमेलनात इतिहासकार सु. ग. जोशी, डॉ. नागोराव कुंभार, डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांचा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment